अल्पवयीन विद्यार्थिनीने धावत्या रिक्षातून मारली उडी  file photo
ठाणे

ठाणे : अल्पवयीन विद्यार्थिनीने मारली धावत्या रिक्षातून उडी

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : खासगी क्लासवरून सुटल्यानंतर रिक्षातून घरी परतताना चालकाने रिक्षात बसलेल्या एका अल्पवयीन विद्यार्थीनीशी लगट करण्याचा प्रयत्न केला. रिक्षावाला आपल्याशी गैरवर्तन करत असल्याची जाणीव झाल्यावर विद्यार्थीनीने धावत्या रिक्षामधून बाहेर उडी मारून स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न केला. रिक्षावाल्याने या विद्यार्थीनीशी अश्लिल कृत्य करण्याच्या इराद्याने पाठलाग करून तिला शिवागाळ केली.

रिक्षावाल्याच्या तावडीतून सुटका करवून घेतलेल्या विद्यार्थीनीने हा सारा प्रकार घरी गेल्यानंतर आई-वडिलांना सांगितला. आईच्या तक्रारीवरून कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपासचक्रांना वेग देऊन गोपाळ मुदलियार या रिक्षावाल्याला अटक केली. गेल्या काही महिन्यांपासून विद्यार्थीनींच्या बाबतीत सार्वजनिक ठिकाणी होत असलेल्या गैरवर्तनाबद्दल पालकांत चिंतेचे वातावरण आहे.

या संदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्वेकडे राहणारी एक अल्पवयीन विद्यार्थीनी दररोज सकाळी खासगी क्लासला जाते. घरी येताना ती क्लासच्या बाहेर मिळणार्‍या रिक्षातून घरी येते. सोमवारी ही विद्यार्थीनी घरी येण्यासाठी एका रिक्षात बसली. रिक्षा सुरू झाल्यानंतर काही वेळाने चालक गोपाळ या विद्यार्थीनीकडे तिचा मोबाईल क्रमांक मागू लागला. विद्यार्थीनीने त्यास नकार दिला. त्यानंतर गोपाळने विद्यार्थीनीची छेड काढण्यास सुरूवात केली. रिक्षावाला आपल्याशी गैरवर्तन करत असल्याची जाणीव होताच विद्यार्थीनीने त्याला रिक्षा थांबविण्यास सांगितले. मात्र याकडे दुर्लक्ष करून गोपाळ याने रिक्षा वेगात चालवली. रिक्षावाला आपले अपहरण करत असल्याची जाणीव झाल्यावर विद्यार्थीनीने धाडस करून धावत्या रिक्षामधून उडी मारली. ही विद्यार्थीनी रस्त्यावर आदळली. तशीच उठून तिने घराच्या दिशेने पळ काढला. तरीही रिक्षावाल्याने पाठलाग करून शिवीगाळ करत तिला धमकावले. घरी आल्यावर विद्यार्थीनीने स्वतःवर बेतलेला प्रसंग पालकांना सांगितला. पालकांच्या तक्रारीवरून गुन्हा तक्रार दाखल होताच पोलिसांनी रिक्षावाला गोपाळ मुदलियार याला रिक्षा स्टँडवरून अटक केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT