वासिंद : टोकाकडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत आढळून आलेल्या एका अनोळखी वृद्धाच्या खुनाचे गूढ उलगडण्यास वासिंदच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. सदरचा गुन्हा इसमाच्या सावत्र मुलाने केल्याचे समोर आले असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 6 ऑक्टोबर रोजी टोकाकडे पोलीस ठाण्ो हद्दीत मौजे दिवानपाडा हद्दीतील उदालडोह गावचे फाट्यापासून पुढे मोरोशी बाजूकडे अहिल्यानगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गाच्या उजव्या बाजूला रोड लगत झाडा झुडपात अज्ञात इसमाने अनोळखी वृद्धाचा मृतदेह टाकून दिला होता. याबाबत टोकाकडे पोलीस ठाण्यात झालेल्या गुन्हा नोंदीनुसार गुन्हा उघडकीस आणण्याकामी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने परिसरातील सर्व सीसीटिव्हींची, महाराष्ट्र व इतरत्र दाखल मनुष्य मिसिंगची पडताळणी केली.
तसेच संशयीत वाहनांची कसून तपासणी केली; परंतु मयताची ओळख पटवणे कठीण जात होते. गुन्ह्यांचा कुठलाही धागादोरा नसतांना पोलीस उपनिरीक्षक महेश कदम व त्यांचे पथकाने तांत्रीक विश्लेषणाचे आधारे सदरचा अनोळखी मृतदेह हा राजेश शांतीलाल ठक्कर ऊर्फ राजु चाचा ऊर्फ बक्कल रा. काटेमानीवली, (ता. कल्याण) यांचा असल्याचे निष्पन्न झाले. या घटनेप्रकरणी मयत इसमाचा सावत्र मुलगा नामे नवीद लतीफ सैय्यद (वय 28) यास पोलिसांनी ताब्यात घेत त्याने त्याची आई व मयताची दुसरी पत्नी तसेच भाऊ व मयताचा दुसरा सावत्र मुलगा यांचे मदतीने गुन्हा केला असल्याची कबुली दिली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास हा टोकावडे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संजीव साखरे हे करीत आहेत.