MVA MNS alliance file photo
ठाणे

MVA MNS alliance: महायुतीला थेट आव्हान! ठाण्यातून मनसे-मविआ युतीचा 'श्रीगणेशा'? आव्हाडांच्या बंगल्यावर महत्त्वपूर्ण बैठक!

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाण्यामध्ये एक मोठी राजकीय समीकरणे जुळण्याची शक्यता आहे.

मोहन कारंडे

MVA MNS alliance

ठाणे: मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीला शह देण्याकरीता शिवसेना ठाकरे गट व महाराष्ट्र नवनिर्माण सेना युतीसाठी दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांचे प्रयत्न सुरू असतानाच ठाण्यामध्येही मोठी राजकीय समीकरणे जुळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या ठाण्यातील 'नाद' या निवासस्थानी नुकतीच एक महत्त्वाची बैठक पार पडली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या बैठकीमुळे महायुती विरोधात महाविकास आघाडी (MVA) आणि मनसे (MNS) एकत्र येण्याच्या हालचाली दिसून येत आहेत.

या बैठकीला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे माजी खासदार राजन विचारे, मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण उपस्थित होते. जितेंद्र आव्हाड यांनी या बैठकीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. "आम्हा चौघांमध्ये ठाण्यातील विविध प्रश्नांबाबत, नागरी समस्यांबाबत सुमारे तासभर चर्चा झाली," असे त्यांनी म्हटले असले तरी, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेली ही बैठक निवडणूक एकत्र लढवण्याच्या तयारीतील पहिली पायरी असल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे.

आव्हाड यांच्या या पोस्टमुळे महायुतीविरोधात ठाण्यात मनसे आणि मविआ एकत्र येण्यावर शिक्कामोर्तब झाले असून, युतीचा हा 'शुभांरभ' ठाण्यातून होत असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. ठाणे शहरातील समस्या ट्रॅफिक, डम्पिंग, पाणी समस्या, अनधिकृत बांधकाम, सेवा रस्ता, मेट्रो, अनधिकृत फेरीवाले आणि ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी यांच्या विरोधात सर्व विरोधी पक्ष एकत्र येत असल्याचे दिसत आहे.

राज-उद्धव एकत्र हवेत, पण प्रभाग गमावण्याची भीती

दरम्यान, मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवण्यासाठी उद्धव आणि राज हे ठाकरे बंधू एकत्र हवेत, पण या युतीमुळे गेल्या अनेक वर्षांपासून बांधलेले प्रभाग गमावण्याची भीती शिवसेनेच्या माजी नगर-सेवकांसह इच्छुकांना वाटत आहे. त्यामुळे नगरसेवक बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या इच्छुकांमध्ये प्रभागात सक्रिय राहायचे की नाही, याबाबत संभ्रम आहे. शिवसैनिक व मनसैनिकांनाही दोघे भाऊ एकत्र यावेसे वाटते. मात्र ठाकरे गटाच्या अनेकांना यात प्रभाग गमावण्याची भीती वाटू लागली आहे. दोन्ही पक्षांचे बालेकिल्ले जवळपास एकच असल्यामुळे मनसे अशा बालेकिल्यांतील प्रभागांवर दावा करू शकते. गेल्या अनेक वर्षांपासून त्या प्रभागातून निवडून येणाऱ्या ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकाला घरी बसावे लागेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT