डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा
कल्याण ग्रामीण येथे असणाऱ्या वरप गावात सात वर्षीय मुलावर अज्ञात इसमाने हल्ला केल्याची घटना घडली आहे (dombivali crime). कळवा येथील शिवाजी महाराज रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असून मुलाची प्रकृती स्थिर असल्याने रुग्णालयातून त्याला घरी सोडण्यात आले. मात्र या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नेमका हल्ला कोणी केला त्याचा शोध पोलीस घेत आहेत.
जखमी मूलगा आपली आई आणि आजी आजोबांबरोबर आत्मारामनगर परिसरात राहतो. हा मुलगा दुपारी ३ ते ३.३० च्या दरम्यान खेळत होता मात्र, त्यानंतर तो अचानक दुसऱ्या गल्लीतून जखमी अवस्थेत बाहेर आला. त्याला विचारले असता घाबरला असल्याने सुरुवातीला तो कुत्रा चावला आहे, असे सांगू लागला. मात्र उपचार झाल्यानंतर त्याने हळूहळू रात्री आपल्याला चाकूने मारल्याचे त्यांने घरच्यांना सांगितले.
यासंदर्भात सोमवारी सकाळी मुलाचा मामा पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेला असता मांडा टिटवाळा पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली नाही. मात्र, मंगळवारी दुपारी पोलिसात तक्रार दाखल झाली आहे. सध्या आरोपीला शोधण्याचे आव्हान पोलिसांपुढे ठाकले आहे.
दरम्यान, या घटनेची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी आरोपीना पोक्सो अंतर्गत कायदेशीर कारवाही करावी अशी मागणी करण्यात येत असून लहान मुलं घराबात असताना पालकांनी लक्ष ठेवावे, असे आवाहन देखील पोलिसांनी केले आहे. हल्ला समाजकंटक की पूर्व वैमनस्यातून झाला याचा शोध घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले.