Murbad Trauma Care Center Pudhari
ठाणे

Murbad Trauma Care Center: मुरबाडच्या ट्रामा केअर सेंटरचा कारभार चव्हाट्यावर; कोट्यवधींची बांधकामे, उपचार मात्र रामभरोसे

औषधांचा तुटवडा, डॉक्टरांची अनुपलब्धता अन् वीज-पाण्याच्या समस्यांनी रुग्ण त्रस्त; करंगळीच्या एक्स-रेसाठी रुग्णाला खासगी रुग्णालयात २,६०० रुपये खर्च

पुढारी वृत्तसेवा

किशोर गायकवाड

मुरबाड शहर: गोरगरीब रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत म्हणून उभारण्यात आलेल्या मुरबाडच्या शासकीय ट्रामा केअर सेंटरचा कारभारच आजारी पडल्याचे चित्र आहे. एक्स-रे मशीन बंद, सोनोग्राफी मशीन अनेक दिवसांपासून बंद, औषधांचा तुटवडा, डॉक्टरांची अनुपलब्धता, पंखे बंद, वीज-पाण्याच्या समस्या अशा तक्रारींमुळे रुग्णालयातील सुविधांचा बोजवारा उडाला आहे. ट्रामा केअर सेंटरचा गवगवा केला जात असताना प्रत्यक्षात मात्र रुग्णांना उपचारासाठी खासगी रुग्णालयांची वाट धरावी लागत आहे.

करंगळीला दुखापत झाल्याने शासकीय रुग्णालयात गेलेल्या मयूर शंकर चौधरी यांना एक्स-रे मशीन बंद असल्याचे सांगण्यात आले. अखेर खासगी रुग्णालयात उपचारासाठी त्यांना २,६०० रुपये खर्च करावे लागले.

तर नऊ वर्षीय आदिवासी मुलीच्या फ्रॅक्चरवरील उपचारासाठी एक्स-रे, डॉक्टर, प्लास्टर साहित्य अशा प्रत्येक टप्प्यावर नातेवाइकांना अडचणींचा सामना करावा लागल्याची तक्रार आहे. सागर तेलवणे यांनीही सोनोग्राफी मशीन बंद असल्याने रुग्णांना होणाऱ्या त्रासाकडे लक्ष वेधले आहे.

रात्रीच्या वेळी तातडीच्या रक्त व इतर तपासणींसाठी ज्यादा पैसे मोजावे लागतात. त्यामुळे प्रयोगशाळा रात्रीच्या वेळी सुद्धा सुरू ठेवण्याची मागणी आजतागायत प्रलंबित आहे. यामागे कोणता आर्थिक गौडबंगाल तर नाही ना? अशी शंका उपस्थित केली जात आहे.

यापूर्वी वीजपुरवठ्याचा लपंडाव, जनरेटरच्या बॅटरी चोरीला जाणे आणि सर्पदंशाच्या रुग्णांच्या मृत्यूच्या घटनांमुळेही रुग्णालयाच्या व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित झाले आहेत. विशेष म्हणजे कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेले पत्र्याचे शेड तोडून त्यावर नवीन मजला बांधण्यात आला; मात्र त्याचा उपयोग आणि प्रयोजन अद्याप स्पष्ट झालेले नाही.

चौकशी करण्याची मागणी

गेल्या दशकभरातील बांधकामे, यंत्रसामग्री खरेदी, दुरुस्ती, ठेकेदारांची देयके आणि खर्चाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी होत आहे. जिल्हा आरोग्य प्रशासनाचे या रुग्णालयाकडे दुर्लक्ष आहे का, असा सवालही उपस्थित होत आहे. आरोग्यमंत्र्यांनी तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून बंद सुविधा सुरू कराव्यात, जबाबदारी निश्चित करावी आणि रुग्णालयाचा कारभार सुधारावा, अशी मुरबाडकरांची मागणी आहे.

रुग्णालयासाठी कोट्यवधी खर्च होऊनही रुग्णांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात जावे लागत असेल, तर या खर्चाचा उपयोग नेमका कोणासाठी, याचे उत्तर प्रशासनाने द्यावे, अशा प्रतिक्रिया समोर येत आहेत.

कर्मचाऱ्यांच्या प्रतीक्षेत रुग्ण

हॉस्पिटलमध्ये येणारा कर्मचारी वर्ग वेळेत येत नसल्याने रुग्णांना दीर्घकाळ त्यांच्या प्रतिक्षेत ताटकळत उभे लागत असल्याची तक्रार रुग्ण व त्यांचे नातेवाईक करत असतात. परिणामी कर्मचारी वर्गावर संबंधित वरिष्ठांचा नियंत्रण नसल्याचे निमित्ताने समोर येत आहे. त्यामुळे कर्मचारी वर्गाच्या वेळेत उपस्थितीसाठी प्रभावीपणे बायोमेट्रिक हजेरी प्रणाली कार्यरत ठेवण्याची देखील मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT