मुरबाड नगरपंचायत pudhari photo
ठाणे

Thane News : भाजपचा डाव यशस्वी

Murbad Nagar Panchayat : मुरबाड नगरपंचायतीत सत्तासमीकरण बदलले; एकनाथ शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का

पुढारी वृत्तसेवा

मुरबाड शहर : किशोर गायकवाड

मुरबाड नगरपंचायतीत अखेर वनमंत्री गणेश नाईक यांचा राजकीय डाव यशस्वी ठरला असून नगरपंचायतीतील सत्तेचे समीकरण पूर्णपणे बदलल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या घडामोडींमुळे ठाणे जिल्ह्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या वर्चस्वाला मोठा धक्का बसल्याची राळ उठली आहे.

मुरबाड नगरपंचायतीचे नगराध्यक्ष व उपनगराक्षांसह नऊ नगरसेवकांनी भाजप पक्ष व आमदार किसन कथोरे यांची साथ सोडून ‌‘परिवर्तन पॅनल‌’ स्थापन करत शिंदेसेनेत प्रवेश केला होता. कालांतराने या नगरसेवकांमधील चढाओढ, अंतर्गत हेवेदावे, विकास कामांमधील स्पर्धा अस्वस्थता, सत्तेची लालसा व आपसी समन्वयाचा अभाव यामुळे आपसी नाराजी वाढत गेल्याची बोंब आहे.

याच पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांविरोधात 17 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे. संबंधित 13 नगरसेवक सध्या ‌‘नॉट रिचेबल‌’ असल्याची माहिती आहे.

मुरबाड नगरपंचायतीत शिंदेसेनेचे 5, भाजपचे 10 आणि 2 अपक्ष असे संख्याबळावेळी भाजपची एकहाती सत्ता असतांना नगराध्यक्षपदी संतोष चौधरी विराजमान झाले होते. त्यांनतरच्या घडामोडीत देखील नगराध्यक्ष पदाची खुर्ची चौधरी यांच्याकडेच राहिली. तर आता त्यांच्या मित्रपक्षातील 13 सदस्य हे गणेश नाईक समर्थक असल्याने अखेर गणेश नाईक यांनी राजकीय डाव टाकत मुरबाड नगरपंचायतीत राजकीय चक्रे फिरवल्याचे समीकरण चर्चिले जाते. परिणामी ठाणे जिल्ह्यातील एक प्रतिष्ठेची नगरपंचायत शिंदे गटाकडून हिसकावून घेतली गेली आहे.

अविश्वास ठराव दाखल

गत उपनगराक्षाच्या निवडणूकीत शिंदेसेनेच्या नगरसेवक सदस्याला भाजपकडून उपनगराध्यक्षपद देण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, या निर्णयाला विरोध करत 17 पैकी 9 मते मिळवून अपक्ष नगरसेविका दिक्षिता भरत वारे या उपनगराध्यक्षा पदी विराजमान झाल्या होत्या व पुढे त्यांच्या निवडीला रीतसर जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता देखील मिळवण्यात आली. तद्नंतर या नऊ नगरसेवकांनी वेगळा ‌‘परिवर्तन पॅनल‌’ स्थापन करून कालांतराने या गटाने शिंदेसेनेत प्रवेश केला.

तथापि, नगरसेवकांमधील समन्वयाचा अभाव आणि मुख्याधिकारी वैद्यकीय रजेवर गेल्यामुळे निर्णयप्रक्रियेत अडथळे निर्माण होऊ लागल्याच्या सबबी समोर आल्या. परिणामी परिवर्तन पॅनलला सोडचिठ्ठी देत सुमारे सात नगरसेवक फुटले. उर्वरित सहा नगरसेवकांसह नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास ठराव दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT