मुरबाड : मुरबाड नगरपंचायतीमार्फत मुस्तांग एसएम ऍडव्हान्स रिनेव्हेबल एनर्जी या कंपनीकडून मोठ्या खर्चातून खरेदी करण्यात आलेली मशीन सध्या बंद अवस्थेत पडून असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने केला आहे. सरकारी निधीतून खरेदी केलेल्या या मशीनचा कोणताही वापर होत नसल्याने जनतेच्या पैशांचा अपव्यय होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे मुरबाड शहर सचिव कैलास दत्तात्रय खरे यांनी सोमवारी नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले आहे. या निवेदनानुसार, संबंधित मशीन खरेदी करण्यासाठी नगरपंचायतीमार्फत मोठ्या प्रमाणात शासकीय निधी खर्च करण्यात आला आहे. मात्र, खरेदी केलेली मशीन सध्या बंद अवस्थेत असून तिचा प्रत्यक्ष वापर होत नसल्याचे निदर्शनास आले आहे.
तर इंडिया मार्टवर कमी दरात उपलब्ध असलेल्या मशीनपेक्षा दुप्पट रक्कम मोजून संबंधित मशीन खरेदी करण्यात आल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. यापूर्वी माहिती अधिकार कायद्या अंतर्गत मशीन खरेदी प्रक्रियेची माहिती मागविण्यात आली होती. मात्र, अपूर्ण माहिती मिळाल्याने प्रथम अपील आणि तक्रारही दाखल करण्यात आल्याचे निवेदनात नमूद आहे.
या प्रकरणात अद्याप समाधानकारक कार्यवाही झाली नसल्याने मशीन बंद पडण्याचे नेमके कारण शोधून तांत्रिक तपासणी करावी, संबंधित कंपनीकडून तातडीने दुरुस्ती करून मशीन सुरू करावी, खरेदी प्रक्रिया, निविदा आणि प्रत्यक्ष कामकाजाची सखोल चौकशी करावी, तसेच केलेल्या कार्यवाहीचा लेखी अहवाल द्यावा, अशा चार प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.
आता नगरपंचायत प्रशासन या तक्रारीची कितपत गांभीर्याने दखल घेते आणि लाखोंच्या खर्चातून खरेदी केलेल्या मशीनचा वापर पुन्हा सुरू होतो का, याकडे मुरबाडकरांचे लक्ष लागले आहे.