Murbad Gas Shortage Pudhari
ठाणे

Murbad Gas Shortage: मुरबाडमध्ये गॅस एजन्सीबाहेर वाढती गर्दी; नियंत्रणासाठी सेल्फ डिलिव्हरी बंदचा निर्णय

लांबच लांब रांगांवर नियंत्रणासाठी पाऊल; आता सर्व ग्राहकांना केवळ होम डिलिव्हरीनेच एलपीजी सिलिंडर

पुढारी वृत्तसेवा

मुरबाड शहर, किशोर गायकवाड

मुरबाड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या एलपीजी गॅस तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांच्या एजन्सीबाहेर लागणाऱ्या लांबच लांब रांगांवर नियंत्रण मिळवण्यासाठी अखेर गॅस एजन्सीकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. अंजनी गॅस सर्व्हिसने ‌‘सेल्फ डिलिव्हरी‌’ पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेत, याबाबत एजन्सीबाहेर अधिकृत फलक लावून ग्राहकांना सूचना दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून गॅस पुरवठा खंडित होण्याच्या भीतीने ग्राहक पहाटेपासूनच एजन्सीबाहेर सिलिंडर घेण्यासाठी रांगा लावत होते. या प्रचंड गर्दीमुळे गॅस वितरण व्यवस्थेवर ताण निर्माण झाला होता. याच पार्श्वभूमीवर एजन्सीकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, मोठ्या प्रमाणावर ग्राहक स्वतः सिलिंडर नेण्यासाठी येत असल्याने कार्यालयात आणि वितरण ठिकाणी गर्दी वाढत आहे, परिणामी नियोजित होम डिलिव्हरी व्यवस्थेत व्यत्यय येत आहे.

एजन्सीने लावलेल्या फलकानुसार, “आजपासून सेल्फ डिलिव्हरी पूर्णपणे बंद करण्यात येत असून, सर्व ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर नियमित होम डिलिव्हरीद्वारेच सिलिंडर पुरवले जातील,” असे स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयातून नागरिकांमधील संभ्रमाचे वातावरण दूर करण्यासाठी एजन्सीचे प्रयत्न आहे. मात्र आधीच गॅस तुटवड्यामुळे त्रस्त असलेल्या ग्राहकांना आता होम डिलिव्हरी वेळेवर मिळेल का, याबाबत शंका व्यक्त होत असतांना काही ग्राहकांनी “रांगा टाळण्यासाठी निर्णय योग्य असला, तरी प्रत्यक्षात गॅस वेळेवर मिळणे महत्त्वाचे आहे,” अशी प्रतिक्रिया दिली.

यापूर्वीच मुरबाडमध्ये गॅस तुटवड्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, नागरिकांना पहाटेपासून रांगेत उभे राहावे लागत होते. अनेकांना सिलिंडर खांद्यावर वाहून नेण्याची वेळ आली होती, तर कमर्शियल गॅसअभावी हॉटेल व लघुउद्योगही अडचणीत आले आहेत. अशा परिस्थितीत एजन्सीचा हा निर्णय रांगांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सकारात्मक पाऊल मानला जात असला, तरी गॅस पुरवठा नियमित व पुरेसा होणे अत्यावश्यक असल्याचे नागरिकांचे मत आहे. दरम्यान, प्रशासन व संबंधित यंत्रणांनी गॅस पुरवठ्याबाबत धोरण आखून ग्रामीण व अर्धनगरी भागातील नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT