किशोर गायकवाड
मुरबाड शहर: मुरबाड तालुक्यातील चासोळे ग्रामपंचायत हद्दीतील कथित बोगस घरपट्टी प्रकरण चांगलेच तापले असून, संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ अरुण राऊत यांनी मुरबाड पंचायत समिती कार्यालयासमोर सुरू केलेले आमरण उपोषण गटविकास अधिकारी लता गायकवाड यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले.
या आश्वासनामुळे ग्रामपंचायत अधिकारी, शिपाई, डाटा ऑपरेटर तसेच संबंधित सरपंचांबाबत पुढील प्रशासकीय कारवाईची शक्यता निर्माण झाली आहे.
चासोळे ग्रामपंचायतीतील घरपट्टी नोंदींच्या चौकशीदरम्यान काही ठिकाणी खाडाखोड करून घरपट्टी आकारणी करण्यात आल्याचे, तसेच प्रत्यक्ष घर अस्तित्वात नसतानाही नमुना क्रमांक ८ मध्ये घरपट्टीच्या नोंदी करण्यात आल्याचे निदर्शनास आल्याचे पंचायत समितीच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
तसेच ग्रामपंचायतीची पूर्वपरवानगी नसताना डाटा ऑपरेटरकडून काही घरपट्टी नोंदी करण्यात आल्याचा मुद्दाही चौकशीत पुढे आला आहे. या प्रकरणी संबंधित ग्रामपंचायत अधिकाऱ्यांविरुद्ध निलंबनाच्या कारवाईसाठी आवश्यक कागदपत्रे जिल्हा परिषद, ठाणे यांच्याकडे पाठविण्यात आल्याचे गटविकास अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासनात स्पष्ट केले आहे.
सक्षम प्राधिकाऱ्याचा आदेश प्राप्त झाल्यानंतर नियमानुसार पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. दरम्यान, ग्रामपंचायत कर्मचारी व डाटा ऑपरेटर यांच्या नियुक्तीबाबत तसेच त्यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकार ग्रामपंचायतीकडे असल्याने संबंधित शिपाई व डाटा ऑपरेटर यांना नोटीस बजावून त्यांचा खुलासा मागविण्यात येणार आहे. खुलाशाच्या आधारे नियमानुसार पुढील कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
घरच नाही, मग घरपट्टी कशी?
या प्रकरणातील सर्वाधिक गंभीर बाब म्हणजे प्रत्यक्ष घर अस्तित्वात नसतानाही घरपट्टीच्या नोंदी करण्यात आल्याचा आरोप. अशा सर्व नोंदींची ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन शहानिशा करावी, त्यानंतर नोंदी योग्य असल्याचे आढळले नाही तर नियमानुसार त्यात दुरुस्ती अथवा कपात करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
यामुळे आता चासोळे ग्रामपंचायतीच्या घरपट्टी नोंदवहीतील आणखी किती नोंदी संशयाच्या भोवऱ्यात आहेत, याची तपासणी महत्त्वाची ठरणार आहे. केवळ कागदोपत्री नोंदी करून घरपट्टी आकारण्यात आली असेल, तर त्यामागे नेमकी कोणाची भूमिका होती, याचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.