Suresh Gopinath Mhatre - बाळ्या मामा  pudhari file photo
ठाणे

Murbad Assembly Constituency | सुभाष पवार यांना पक्षात घेणार नाही - खा. सुरेश म्हात्रे

पुढारी वृत्तसेवा

बदलापूर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुरबाड विधानसभा मतदारसंघातून इचछुक असलेले, सध्या शिवसेनेच्या शिंदे गटात असलेले जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष पवार हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करून विधानसभेची निवडणूक लढवण्याचे मनसुबे आखात असल्याची चर्चा त्यांच्या समर्थकांमध्ये आहे. त्याला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी काही दिवसांपूर्वी खतपणी घातलं होतं. मात्र सुभाष पवार यांचे मनसुबे स्थानिक खासदार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांनी धुळीस मिळवले आहेत. सुभाष पवार यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात कोणतही स्थान नाही. तसेच त्यांना पक्षात घेणार नाही अशी शरद पवार यांची भूमिका असल्याचे स्पष्ट मत सुरेश म्हात्रे यांनी बदलापूर येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

बदलापूरात त्यांनी विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेटीगाठी दिल्या. खासदार झाल्यानंतर पहिल्यांदाच गणेशोत्सव असल्याने त्यांनी बदलापुरातील महत्त्वाच्या मंडळांना आणि कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांच्या घरी भेटीसाठी दिल्या. या वेळेस बदलापूर शहराध्यक्ष शैलेश वडनेरे आणि पदाधिकारी उपस्थित होते.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पत्रकारांनी प्रश्न विचारला असता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि महाविकास आघाडीकडे स्वतःचे असे अनेक चेहरे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे पक्षाविरोधात टोकाचे काम करणार्‍या सुभाष पवार यांना पक्षात कोणत्याही परिस्थितीत घेणार नाही. तसेच त्यांना तिकीट मिळणे तर दूरच त्यांना पक्षातही घेणार नसल्याचा घणाघात सुरेश म्हात्रे यांनी केला.

लोकसभा निवडणुकीपूर्वी सुभाष पवार यांना शरद पवार यांनी फोन करून भेटीसाठी बोलावले होते. मात्र तरीही त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाविरोधात जोरदार प्रचार करत भाजपच्या उमेदवाराचा प्रचार केला. त्यामुळे आता ते कोणत्या तोंडाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तिकीट मागत आहेत? असा सवालही सुरेश म्हात्रे मात्र यांनी उपस्थित केला आहे. कोरोना काळात सुभाष पवार यांची प्रकृती खालावलेली असताना शरद पवार यांनी त्यांच्यासाठी हॉस्पिटल व इतर मेडिकल सुविधा उपलब्ध करून दिल्या. मात्र केलेले उपकार विसरलेले सुभाष पवार हे आमच्याबरोबर कायम राहतील याबाबत कोणताही गॅरंटी नाही. त्यामुळे अशा उमेदवारांना पक्षात घेण्यास किंवा त्यांना उमेदवारी देण्याचा प्रश्नच येत नसल्याचे म्हात्रे यांनी सांगितले.

मुरबाड-बदलापूर भागातून अनेक स्थानिक पदाधिकारी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असून त्यांच्यातीलच एकाला तिकीट मिळेल असेही म्हात्रे यांनी स्पष्ट केले. म्हात्रे यांच्या सुभाष पवार यांच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेमुळे सुभाष पवार आता कोणत्या पक्षाकडे तिकिट मागणार हा प्रश्न शिल्लक राहिला आहे. कारण मुरबाड विधानसभा मतदारसंघ हा महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा पारंपारिक मतदारसंघ राहिला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT