Aghori ritual Murabad Pudhari
ठाणे

Aghori ritual Murabad: मुरबाडमध्ये स्मशानभूमीत अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार उघड

बोकडांची मुंडकी आणि संशयास्पद साहित्य आढळल्याने ग्रामस्थांमध्ये भीती; कठोर कारवाईची मागणी

पुढारी वृत्तसेवा

मुरबाड शहर : किशोर गायकवाड

कल्याण-माळशेज राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या नेवाळपाडा स्मशानभूमीत अघोरी पूजेचा गंभीर प्रकार रविवारी उघडकीस आला आहे. स्मशानभूमी परिसरात बोकडांची मुंडकी, पूजेसाठी वापरलेले साहित्य व इतर संशयास्पद वस्तू आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी तत्काळ पोलीस पाटील व सरपंच यांना दिली. त्यानंतर पोलीस प्रशासनाला कळविण्यात आले असून, पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे. आजही आपल्यावर येणारे संकट, गंडांतर टाळण्यासाठी बकरी किंवा बोकडाचा बळी देण्याची अंधश्रद्धा काही भागांत प्रचलित आहे. देवा-धर्माच्या नावाखाली मुक्या प्राण्यांचा निर्दयपणे बळी देण्याचे प्रकार लपूनछपून सुरूच आहेत. स्वतःच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी भोंदू बाबांच्या नादी लागून असे अमानवी कृत्य केले जात असल्याच्या घटना कानावर येत असतात. अनेकवेळा वैरभावातूनही एकमेकांवर जादूटोण्याचे प्रयोग केले जात असल्याचे जाणकार सांगतात.

कठोर कारवाई करण्याची मागणी...

ग्रामीण भागात ‌‘अंगात येणे‌’ यासारखे प्रकार आजही मोठ्या प्रमाणात आढळतात. मात्र, हा मानसिक आजार असून त्यावर मानसोपचार तज्ज्ञांकडून योग्य उपचार शक्य असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. दरम्यान, स्मशानभूमीत अशा प्रकारे अघोरी पूजा करून सामाजिक शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

इंदिरावाडी स्मशानभूमीत अज्ञात व्यक्तींनी येऊन अघोरी पूजा केल्याची घटना अत्यंत निंदनीय आहे. या प्रकारामुळे गावात व परिसरात भीतीचे वातावरण आहे. पूजा कोणत्या उद्देशाने करण्यात आली, याची सखोल चौकशी करून दोषींवर पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करावी.
भाऊ झुंजारराव, पोलीस पाटील, सरळगाव - नेवाळपाडा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT