Navi Mumbai Municipal Coropration Pudhari
ठाणे

Teacher Shortage: ठाणे महापालिका शिक्षण विभागात रिक्तपदांची समस्यामाध्यमिक आणि प्राथमिक विभागाची २५७ शिक्षकांची पदे रिक्त

३२७ तासिका शिक्षक नेमणार

पुढारी वृत्तसेवा

ठाणे: महापालिकेच्या प्राथमिक तसेच माध्यमिक शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात कायमस्वरूपी शिक्षकांची पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. माध्यमिक विभागात इयत्ता नववी आणि दहावीच्या २३ शाळांमध्ये ३२३७ विद्यार्थ्यांसाठी १०२ शिक्षकांची आवश्यकता असताना केवळ २६ शिक्षक कार्यरत आहेत.

म्हणजेच तब्बल ७६ टक्क्यांहून अधिक शिक्षक पदे रिक्त आहेत. दुसरीकडे प्राथमिक विभागासाठी ७३६ मंजूर पदांपैकी फक्त ५१४ शिक्षक उपलब्ध असून २२२ पदे रिक्त आहेत.

याशिवाय येत्या काही महिन्यांत ३५ शिक्षक सेवानिवृत्त होणार असल्याने रिक्त पदांची संख्या २५७ पर्यंत जाणार आहे. त्यामुळे शिक्षण विभागाचा हा डोलारा संभाळण्यासाठी महापालिका तासिका तत्वावर ३२७ शिक्षकांची भरती होणार असून यासाठी पालिका ४.८८ कोटींचा खर्च करणार आहे.

महापालिकेच्या शिक्षण व्यवस्थेतील गंभीर त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्या आहेत. विशेष म्हणजे कायमस्वरूपी शिक्षकांची पदे रिक्त ठेवून तात्पुरत्या तासिका शिक्षकांच्या भरवशावर शिक्षण व्यवस्था चालविण्याची वेळ महापालिकेवर आली आहे.

महापालिकेच्या माध्यमिक शाळांमध्ये परिस्थिती अधिक चिंताजनक आहे. इयत्ता नववी आणि दहावीच्या २३ शाळांमध्ये ३२३७ विद्यार्थ्यांसाठी १०२ शिक्षकांची आवश्यकता असताना केवळ २६ शिक्षक कार्यरत आहेत. म्हणजेच तब्बल ७६ टक्क्यांहून अधिक शिक्षक पदे रिक्त असल्याचे चित्र आहे. परिणामी ७७ तासिका शिक्षकांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. मराठी माध्यमासाठी ३५, उदूर्साठी २९, इंग्रजीसाठी १० आणि हिंदीसाठी ३ शिक्षकांची आवश्यकता असल्याचे प्रशासनाने स्वत:च्या अहवालात नमूद केले आहे.

दुसरीकडे प्राथमिक शिक्षण विभागातही परिस्थिती काही वेगळी नाही. ७३६ मंजूर पदांपैकी फक्त ५१४ शिक्षक उपलब्ध असून २२२ पदे रिक्त आहेत. याशिवाय येत्या काही महिन्यांत ३५ शिक्षक सेवानिवृत्त होणार असल्याने रिक्त पदांची संख्या २५७ पर्यंत जाणार आहे. त्यामुळे २५० तासिका शिक्षकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यामध्ये मराठी माध्यमासाठी १६६, उदूर्साठी ४९, हिंदीसाठी २४ आणि इंग्रजी माध्यमासाठी ११ शिक्षकांचा समावेश आहे. या दोन्ही प्रस्तावांवर एकत्रितपणे जवळपास ४.८८ कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. माध्यमिक विभागासाठी १ कोटी ६५ लाख १६ हजार ५०० रुपये तर प्राथमिक विभागासाठी ३ कोटी २३ लाख ४४ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे.

मात्र या खचार्पेक्षा मोठा प्रश्न म्हणजे शिक्षकांच्या रिक्त पदांकडे इतकी वर्षे दुर्लक्ष का करण्यात आले, हा आहे. माध्यमिक शिक्षकांना प्रति तास १५० रुपये मानधन महापालिकेच्या प्रस्तावानुसार माध्यमिक शिक्षकांना प्रति तास १५० रुपये तर प्राथमिक शिक्षकांना प्रति तास १०० रुपये मानधन दिले जाणार आहे.

नियुक्ती प्रक्रिया शाळा व्यवस्थापन व विकास समितीमार्फत राबविण्यात येणार असून जाहिरात, मुलाखत आणि पाठनिरीक्षणाच्या आधारे शिक्षकांची निवड केली जाणार आहे. बी.एड. पात्रताधारक, अनुभवी तसेच सेवानिवृत्त शिक्षकांना प्राधान्य दिले जाणार आहे. विशेष बाब म्हणजे या नियुक्त्या पूर्णपणे तात्पुरत्या स्वरूपाच्या असतील. शासनाच्या पवित्र पोर्टलमार्फत किंवा नियमित भरती प्रक्रियेतून शिक्षक उपलब्ध झाल्यानंतर त्यांची सेवा तत्काळ समाप्त केली जाऊ शकते.

त्यामुळे कायमस्वरूपी शिक्षक भरतीचा प्रश्न मात्र अद्याप अनुत्तरितच राहणार आहे.महापालिकेच्या अर्थसंकल्पात उपलब्ध निधी अपुरा पडत असल्याने अतिरिक्त आर्थिक दायित्व स्वीकारण्याची वेळही प्रशासनावर आली आहे. माध्यमिक विभागासाठी सुमारे १७.६३ लाख रुपये आणि प्राथमिक विभागासाठी १.२३ कोटी रुपयांचे अतिरिक्त दायित्व स्वीकारण्यास महासभेची मंजुरी मागण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT