municipal corporator fund demand pudhari photo
ठाणे

Thane News : नगरसेवकांच्या कोट्यवधींच्या मागण्या; पालिकेत प्रस्तावांचा वर्षाव

प प्रभागातील कामांसाठी पालिका आयुक्तांकडे प्रस्तावांचा पाऊस प प्रत्येक नगरसेवकाला वर्षाला मिळणार 1 कोटी 40 लाखांचा निधी

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : प्रभागातील विविध प्रकारची कामे करण्यासाठी नगरसेवकांनी पालिका आयुक्तांकडे कोट्यवधींच्या निधीची मागणी केली आहे. यासाठी पालिका प्रशासनाकडे सर्वच प्रभागातून अक्षरशः प्रस्तावांचा पाऊस पडला आहे. विशेष म्हणजे काही नगरसेवकांची मागणी ही 10 ते 15 कोटींच्या घरात असून या प्रस्तावांचा विचार करताना प्रशासनाची दमछाक होत असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान प्रत्येक नगरसेवकाला आपल्या प्रभागात कामे करण्यासाठी वर्षाला 1 कोटी 40 लाख देण्याची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे. निवडणुका न झाल्याने गेल्या पाच वर्षांपासून निधी नसल्याने प्रभागातील रेंगाळलेली कामे करण्यासाठी आता सर्वच नगरसेवकांनी कंबर कसली आहे.

नुकताच ठाणे महापालिकेने आपला अर्थसंकल्प जाहीर केला असून या अर्थसंकल्पावर तीन दिवस चर्चा सुरू होती. तर यावर्षी पहिल्यांदाच अर्थसंकल्पाची चर्चा पहाटे पर्यंत रंगल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर महापालिकेच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे.

आपल्या प्रभागातील कामांना गती मिळावी यासाठी सर्वच नगरसेवक आग्रही असून अर्थसंकल्पाच्या पूर्वीच जवळपास सर्व नगरसेवकांनी पालिका आयुक्तांना निधीसाठी प्रस्ताव दिले आहेत. यामध्ये काही नगरसेवकांनी दोन कोटी, काही नगरसेवकांनी 10 कोटी तर काही नगरसेवकांनी 15 कोटींच्या वर निधीची मागणी केली आहे.

प्रभागासाठी 1 कोटींची तरतूद

प्रशासकीय पातळीवर यापूर्वी प्रत्येक नगरसेवकाला प्रभागातील कामांसाठी 40 लाखांचा निधी हा वर्षाला मिळत होता. त्यानंतर महासभेत तरतूद करून या निधीमध्ये वाढ होत होती. मात्र यावर्षी पहिल्यादांच प्रशासनानेच प्रत्येक प्रभागासाठी 1 कोटींची तरतूद करण्याचा निर्णय घेतला असल्याने प्रत्येक नगरसेवकाला आता 1 कोटी 40 लाखांचा निधी वर्षाला खर्च करायला मिळणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT