नालासोपारा : विजय देसाई
वसई-विरार शहर महानगरपालिकेचा सन 2024-25 च्या सुधारित अर्थसंकल्पासह सन 2025-26 चा मूळ अर्थसंकल्प शुक्रवार, दि.7 मार्च, रोजी वसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त यांच्या तर्फे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी प्रशासक अनिलकुमार पवार यांना सादर केला.
सन 2024-25 चा सुधारीत अर्थसंकल्प रु.3538.94 कोटी व सन 2025-26 चा मूळ अर्थसंकल्प रु.3926.44 कोटींचा (रु. 2.40 कोटी शिलकेसह) आहे. सन 2025-26 च्या अर्थसंकल्पामध्ये, आरोग्य, पाणीपुरवठा योजना व मलःनिस्सारण योजना यासाठी भरीव तरतुदी केलेल्या आहेत.
महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी इंद्रजीत गोरे, उप- मुख्य लेखा व वित्त अधिकारी मनोज पवार, लेखाधिकारी मिलिंद पाटील व संजय पाटील, वरिष्ठ लिपिक भूषण वाघ, महानगरपालिकेच्या अन्य विभागांचे विभागप्रमुख तसेच इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
आगामी वर्षात देखील 5 वर्षाचा मालमत्ता कर आगाऊ भरणार्या मालमत्ता धारकांना मालमत्ता करात 15 टक्के दराने प्रोत्साहनपर सवलत देण्याची तरतुद आहे. परंतू सदर मागणी बीलाचा भरणा हा त्यांनी बिल मिळाल्यापासून 15 दिवसांत करणे आवश्यक आहे. तसेच भविष्यात मालमत्ता करात किंवा इतर करांमध्ये वाढ झाल्यास त्या कराच्या रकमेच्या फरकाचा भरणा मालमत्ता धारकास करावा लागेल. स्वातंत्र्य सैनिक व आजी माजी सैनिक यांच्या पश्चात त्यांची विधवा पत्नी हयात असेपर्यंत त्यांच्या राहत्या स्वमालकीच्या अधिकृत निवासी सदनिकेस वेळोवेळीच्या मागणी नुसार मालमत्ता करात 100 टक्के सुट आहे. निसर्ग ऋण प्रकल्प राबविण्यासाठी एकत्रित मालमत्ता कराच्या 2 टक्के सवलतीसह योजना खर्चाच्या 20 टक्के परंतू अधिकतम रु.1 लाख अनुदान अदा करणेची योजना यावर्षी देखील पुढे चालू ठेवण्यात आली आहे.
जाहिरात परवाना फी व जागा भाडे वसई विरार शहर महानगरपालिकेचे प्रशासकीय ठराव क्र. 330 दिनांक 6 जानेवारी 2021 अन्वये सुधारीत दरपत्रक मंजूर झालेले आहे. त्यानुसार जाहिरात फीचे उत्पन्न वाढीकरीता नविन होर्डिंग उभारणेकरीता प्रभाग निहाय जागा निश्चित करण्याचे सर्वेक्षण सुरु आहे. तसेच अनधिकृत होर्डिंग निष्काषीत करुन त्या जागी मनपाचे होडिंग उभारणे. दुकानाच्या दर्शनी भागावर लावलेल्या फलका ऐवजो इतर जागेवर तात्पुरत्या फलकांचे सर्वेक्षण करुन जाहिराती परवाना शुल्क आकारणी करण्यात येणार आहे. जाहिरात फी द्वारे सन 2024-25 मध्ये रु.5 कोटी 80 लाख व सन 2025-26 मध्ये रु 10 कोटी 5 लाख जमा अपेक्षित आहे.
शहर स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन जमा मालमत्तेवरील सामान्य करासह आकारणी करुन वसुल केल्या जाणार्या विशेष स्वच्छता कर, स्वच्छ भारत अभियान एक व दोन मध्ये घनकचरा प्रक्रिया प्रकल्प, बायोगॅस प्रकल्प तसेच मनपा क्षेत्रातील जिर्ण झालेले आणि आवश्यक नविन शौचालय बांधणेकामी शासनाद्वारे रु. 100 कोटी निधी अनुदानाद्वारे उपलब्ध होणार आहे. तसेच अस्वच्छता व उपद्रव, प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर करण्यांत येणार्या कारवाईद्वारे सन 2025-26 मध्ये रु. 9 कोटी प्राप्त होणार आहे. सन 2024 -25 मध्ये एकूण रु 29 कोटी 2 लक्ष व सन 2025-26 मध्ये एकूण रु. 139 कोटी 53 लक्ष जमा अपेक्षित आहे.