Mumbra water cut Pudhari
ठाणे

Mumbra water cut: मुंब्र्यातील नियोजित पाणीकपात रद्द; दिवाळीत अखंडित पाणीपुरवठा, १६ नोव्हेंबरपर्यंत स्थगित

ठाणे महापालिकेचा निर्णय; मुंब्रा, कळवा आणि घोडबंदर रोड परिसरातील नागरिकांना दिलासा.

पुढारी वृत्तसेवा

मुंब्रा : दिवाळीच्या सणात मुंब्रावासीयांना दिलासा देत ठाणे महानगरपालिका प्रशासनाने सोमवारी (२ नोव्हेंबर) नियोजित १० टक्के साप्ताहिक पाणीकपात रद्द केली आहे.

त्यामुळे मुंब्रा आणि लगतच्या परिसरातील नागरिकांना दिवाळीत अखंडित पाणीपुरवठा मिळणार आहे. पाणीकपातीचे नियोजन आता १६ नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे.

दिवाळीच्या काळात घरगुती पूजा, धार्मिक विधी आणि सणासुदीच्या कामांसाठी पाण्याची अधिक गरज असते. अशा वेळी पाणीकपात लागू झाल्यास नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता होती. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींनी पाणीकपात रद्द करण्याची मागणी केली होती.

या मागणीची दखल घेत पालिका प्रशासनाने नियोजित पाणीकपातीला स्थगिती दिली. या निर्णयामुळे मुंब्र्यातील प्रमुख निवासी भागांसह कळवा आणि घोडबंदर रोड परिसरातील पाणीपुरवठाही सुरळीत राहणार आहे.

मुंब्र्यातील मुख्य वितरण वाहिन्यांना स्टेम प्राधिकरणाच्या माध्यमातून दररोजचा पूर्ण पाणीकोटा उपलब्ध करून दिला जाणार आहे. दरम्यान, १६ नोव्हेंबरनंतर देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी नियोजित पाणीकपात लागू केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे पुढील दोन आठवडे नागरिकांनी पाण्याचा वापर जपून आणि काटकसरीने करावा, असे आवाहन पालिका अधिकाऱ्यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT