सागर स्वीट्स pudhari photo
ठाणे

Thane Food Poisoning : मुंब्र्यात 'अफलातून' मिठाईमुळे तरुणाचा मृत्‍यू

सागर स्वीट्स‍मधील मिठाई खाल्ल्यानंतर पाचजणांची प्रकृती चिंताजनक

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : मुंब्रा रेल्वे स्थानक परिसरातील 'सागर स्वीट्स' या दुकानातून आणलेली 'अफलातून' मिठाई खाल्ल्यानंतर पाच जणांची प्रकृती बिघडली. यामध्ये ३५ वर्षीय जुबेर अन्सारी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, अन्य चारजणांवर रुग्णालयात उपचार सुरू असून, त्‍यांची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात आकस्मिक निधनाची नोंद करण्यात आल्याची माहिती मुंब्रा पोलिसांनी दिली. मिठाई खाल्ल्याने विषबाधा झाली काय? याचा खुलासा अन्न व औषधी प्रशासनाच्या चौकशी आवाहलानंतर स्पष्ट होणार आहे.

मागील आठवड्यात मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळील 'सागर स्वीट्स' येथून 'अफलातून' हा मिठाईचा पदार्थ खरेदी करण्यात आला होता. ही मिठाई खाल्ल्यानंतर ठाकुरपाड्यातील संबंधित तरूणांना काही वेळातच उलट्या, जुलाब आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाला. सुरुवातीला हा त्रास नेमका कशामुळे होत आहे, हे समजले नाही. मात्र, प्रकृती खालावत गेल्याने सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

यामध्ये जुबेर अन्सारी यांची प्रकृती गंभीर बनली होती. अचानक त्यांची ऑक्सिजनची पातळी घसरू लागली. यकृतावरही परिणाम झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलविण्याचा सल्ला देण्यात आला; मात्र दुसरीकडे उपचारासाठी रुग्णालय उपलब्ध न झाल्याचा दावा कुटुंबीयांनी केला. अखेर त्यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच मुंब्रा पोलिसांनी संबंधित दुकानात तपास सुरू केला. घटनास्थळी त्वरित एफडीएचे अधिकारी पोहचले. त्यांनी घटनास्थळाची आणि सागर स्वीट्स दुकांची पहाणी केली. काही सॅम्पल ताब्यात घेऊन ते तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठविण्यात आल्याची माहिती एफडीए अधिकारी भिसे यांनी दिली. मिठाईतून विषबाधा झाली का? हे प्रयोग शाळेच्या आवाहलानंतर समोर येईल अशी माहिती दिली. दरम्यान या घटनेनंतर सागर स्वीट या दुकानाची मुंब्रा शाखा बंद करण्यात आलेली आहे.

'अफलातून' मध्‍ये अंड्याचा वापर

'अफलातून' या नावाने विकल्या जाणाऱ्या मिठाईमध्ये अंड्याचा वापर केला जातो. अंड आणि माव्याचे मित्रण त्यास भरीसभर म्हणजे ड्रायफुट आणि इतर पिष्ठमय पदार्थ हे सगळे मित्रण एकत्र केले जाते. त्यात ते बराच दिवस प्लास्टिकमध्ये पॅक करून आकर्षक आवेष्टनात विकले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT