मुंब्रा: मुंब्रा रेतीबंदर परिसरातील नागरिकांसाठी खाडीकिनारी विरंगुळ्याचे नवे ठिकाण साकारत असून, रेतीबंदर चौपाटीच्या सुशोभीकरणाचे तब्बल ९० टक्के काम पूर्ण झाले आहे.
उर्वरित कामे अंतिम टप्प्यात असून, ही चौपाटी केवळ सुशोभीकरणापुरती मर्यादित न ठेवता बहुउद्देशीय विरंगुळा आणि क्रीडा केंद्र म्हणून विकसित करण्याच्या सूचना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांना दिल्या.
खासदार डॉ. शिंदे यांनी रेतीबंदर चौपाटीची पाहणी करून कामाचा आढावा घेतला. नागरिकांना कुटुंबीयांसोबत निवांत वेळ घालवता यावा, खाडीकिनाऱ्याचा आनंद घेता यावा आणि दैनंदिन धावपळीतून काही क्षण विरंगुळा मिळावा, या उद्देशाने चौपाटी विकसित करण्यात येत आहे.
लहान मुलांसाठी खेळाची साधने व स्वतंत्र जागा, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळ्याच्या सुविधा आणि नागरिकांसाठी पुरेशी बैठक व्यवस्था करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
चौपाटीवर तरुणांसाठी व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, बॉक्स क्रिकेट, कबड्डी आणि स्केटिंग रिंग यांसारख्या क्रीडासुविधा उभारण्याचे नियोजन आहे. नागरिकांना चालणे, धावणे आणि नियमित व्यायाम करता यावा, यासाठी जॉगिंग ट्रॅक उभारण्याच्या सूचनाही खासदारांनी प्रशासनाला दिल्या.
दरम्यान, चौपाटीच्या पाहणीदरम्यान स्थानिक तरुण व्हॉलीबॉल खेळत असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या निदर्शनास आले. तरुणांचा उत्साह पाहून त्यांनीही थेट मैदानात उतरून स्थानिक खेळाडूंसोबत व्हॉलीबॉलचा डाव रंगवला. खासदार नरेश म्हस्के, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त मनीष जोशी आणि प्रशांत रोडे यांनीही खेळात सहभाग घेतला.
खेळाडूंशी संवाद साधत त्यांच्या अडचणी आणि परिसरातील क्रीडा सुविधांची माहितीही खासदारांनी घेतली. त्यामुळे रेतीबंदर चौपाटी आता फक्त फिरण्यासाठी नव्हे, तर खेळ, व्यायाम आणि कुटुंबासोबत विरंगुळ्यासाठीचे ठिकाण बनण्याची शक्यता आहे.