जुन्या व नव्या कसारा घाटात दरडी कोसळल्याने मुंबई–नाशिक महामार्गावरील वाहतुकीवर मोठा परिणाम Pudhari
ठाणे

Kasara Ghat Landslide | अतिवृष्टीमुळे जुन्या कसारा घाटात दरड कोसळली; भातशेती, रस्ते, पूल पाण्याखाली

जुन्या व नव्या कसारा घाटात दरडी कोसळल्याने मुंबई–नाशिक महामार्गावरील वाहतुकीवर मोठा परिणाम

पुढारी वृत्तसेवा

Mumbai Nashik Highway Traffic Alert

कसारा : कसारा व परिसरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी भात व वरईची शेती पाण्याखाली गेली असून रस्ते, पूल आणि गावांचा संपर्कही तुटला आहे. जुन्या व नव्या कसारा घाटात दरडी कोसळल्याने मुंबई–नाशिक महामार्गावरील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला.

उंबरमाळी, वाशाळा, लतीफवाडी आदी भागांतील भात व वरईची शेती जलमय झाली आहे. अतिदुर्गम दापूर माळ, सावरकूट व इतर गाव-पाड्यांकडे जाणाऱ्या रस्त्यांवर मातीचा मलबा व दगड आल्याने या भागांचा संपर्क तुटला आहे. उंबरमाळी रेल्वे स्थानकाबाहेर पूरस्थिती निर्माण झाल्याने रेल्वे प्रवाशांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.

आपत्तीग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी शहापूरचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी रात्रीपासून आपत्ती व्यवस्थापन पथक कार्यरत आहे. पथकातील शाम धुमाळ, दत्ता वाताडे, लक्ष्मण वाघ, भारत धोंगडे, सुनील वाकचौरे, मनोज मोरे, विनोद आयरे, रोहन साबळे आणि गणेश भांगरे यांनी धोकादायक घरांतील नागरिकांना मदत करत सुरक्षितस्थळी हलविण्याचे काम केले. कसारा पोलीस, वनविभाग, महसूल प्रशासन, स्थानिक ग्रामपंचायत तसेच महामार्ग पोलीसही दिवसभर मदत व बचावकार्यासाठी सज्ज होते.

जुन्या कसारा घाटात महाकाय दरड

मुंबई–नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटातील हिवाळा पॉईंटजवळ सोमवारी सकाळी मोठ्या प्रमाणात दरड व मातीचा मलबा महामार्गावर कोसळला. त्यामुळे मुंबईहून नाशिककडे जाणारी वाहतूक काही काळ एकेरी मार्गाने सुरू ठेवावी लागली.

घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन पथकाचे सदस्य दत्ता वाताडे, लक्ष्मण वाघ आणि शाम धुमाळ यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न केले. तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला याबाबत कळविण्यात आले. सकाळी सुमारे १० वाजता यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्यानंतर जेसीबीच्या साहाय्याने दरड व मातीचा मलबा हटविण्यात आला.

या वेळी कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुरेश गावित, पोलीस हवालदार उमेश चौधरी, महामार्ग पोलीस (घोटी) तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे रस्ता वाहतुकीसाठी खुला केला.

दरम्यान, तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी कसारा घाटातील धोकादायक ठिकाणांची तसेच दरड कोसळलेल्या परिसराची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

नव्या कसारा घाटातही दरडी

नवीन कसारा घाटातील बिवळवाडी वळण आणि ब्रेक फेल पॉईंट परिसरातही मोठ्या प्रमाणात दरडी व मातीचा मलबा रस्त्यावर कोसळला. काही ठिकाणी सतत लहान दगड घसरत असल्याने वाहतूक धोकादायक बनली होती. जवळपास दोन तासांच्या प्रयत्नांनंतर जेसीबीच्या साहाय्याने महामार्ग पोलिसांनी रस्त्यावरील मलबा हटवून वाहतूक पूर्ववत केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT