ठाणे : सर्वाधिक प्रवाशांची गर्दी असलेल्या पश्चिम रेल्वे स्थानकावरील प्रवाशांच्या संख्येत घट झाली असल्याचे समोर आले आहे. मुंबई मेट्रोचा झालेला विस्तार,दक्षिण मुंबईमधील खाजगी कंपन्यांचे झालेले स्थलांतर तसेच सागरी किनारी मार्गाचा होत असलेला विकास ही प्रवासी संख्या घटण्यामागची प्रमुख आहेत. प्रवासी संख्येत घट झालेल्या रेल्वे स्थानकातील सर्वाधिक प्रवाशांची घट ही कांदिवली रेल्वे स्थानकावर झाली आहे. या स्थानकांदरम्यान घेण्यात येणारे मेगाब्लॉक हे देखील प्रवासी संख्येत घट होण्यामागचे कारण असल्याचे बोलले जात आहे.
रेल्वे ही मुंबईकरांची जीवनवाहिनी मानली जाते. मात्र गेल्या वर्षभरात या जीवन वाहिनीवरील ताण काही प्रमाणात कमी झाला असल्याचे समोर आले आहे.पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते दहिसर दरम्यानच्या २३ प्रमुख रेल्वे स्थानकांपैकी १९ रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांच्या संख्येत घट झाली आहे. ही प्रवासी संख्या घटल्यामुळे याचा सर्वाधिक फटका हा काही व्यावसायिक केंद्रांना देखील बसला आहे. यामध्ये प्रामुख्याने प्रभादेवी आणि महालक्ष्मी या रल्वेस्थानवरील प्रवासी संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. दुसरीकडे मुंबई सेंट्रल, ग्रॅण्ट रोड, मारिन लाईन, अंधेरी, बोरिवली, वांद्रे या स्थानकावरील प्रवाशांची संख्या देखील कमी झाली असून यामुळे या रेल्वे स्थानकावरील प्रवाशांचा ताण देखील कमी झाला आहे.
रेल्वेवरील ताण कमी करण्यासाठी एमएमआर रिजनमध्ये मेट्रोचे मोठ्या प्रमाणात जाळे निर्माण करण्यात येत आहे. यामध्ये मेट्रो २ अ (अंधेरी पश्चिम ते दहिसर) ही पश्चिम उपनगरातील महत्त्वाची मार्गिका पूर्ण क्षमतेने सुरू आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी आणि उपनगरांना जोडण्यासाठी या पश्चिम व इतर मेट्रो मार्गांचा विस्तार वेगाने सुरू आहे. मेट्रो २ अ आणि ७ चा विस्तार हा अंधेरी पश्चिम ते दहिसर आणि दहिसर ते अंधेरी पूर्व या मार्गिकांवर स्थानकांवरील मोकळ्या जागा व्यावसायिक वापरासाठी व प्रवाशांच्या सोयीसाठी विकसित केल्या जात आहेत. मेट्रो ११ चा विस्तार हा वांद्रे टर्मिनसपर्यंत करण्याचे नियोजन असून धारावीखालून भुयारी मार्गाने तो जोडला जात आहे. मेट्रोच्या या विस्तारामुळे पश्चिम रेल्वेवरील काही प्रवासी हे मेट्रोकडे वळले आहेत.परिणामी प्रवासी संख्येत काही प्रमाणात घट झाली असल्याचे समोर येत आहे.
या कारणांमुळे प्रवाशांची संख्या घटली...
- मेट्रो मार्गाचा झालेला विस्तार
-पश्चिम रेल्वे पेक्षा मेट्रोला प्रवाशांची पसंती
-खाजगी कंपन्यांचे स्थलांतर
-बीकेसीमधील २ लाखांपेक्षा अधिक नोकरदार वर्गाचा कल मेट्रोकडेच
या स्थानकावरील प्रवाशांच्या संख्येत झाली घट...
रेल्वे स्थानक वर्ष (२०२२-२३) वर्ष (२०२५-२६) झालेली घट
मारिन लाईन्स २४,५४५ २१,१९७ -३,३४८
कांदिवली १,३५,५६८ १,२८,४०१ - ७,१६७
प्रभादेवी ५२,९४३ ४९,६२९ -३,३१४
मालाड १,२७,८३४ १,२७,१६२ - ६७२