ठाणे: मुंबईच्या दिशेने धावणाऱ्या कसारा फास्ट लोकलमधून आज सकाळी मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ प्रवासी खाली पडल्याची दुर्घटना घडली. या अपघातात एकुण सहा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. ही घटना सकाळी सुमारे ९.२० वाजण्याच्या सुमारास घडली.
प्रत्येक सकाळी प्रवाशांनी खचाखच भरलेल्या लोकलमधून मोठ्या प्रमाणावर प्रवास होतो. याच गर्दीत कसारा येथून सीएसएमटीकडे जाणारी फास्ट लोकल मुंब्रा स्थानक ओलांडत असताना ११ प्रवासी गाडीतून खाली पडल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. प्रवाशांनी ट्रेनच्या दरवाजांवर लटकून प्रवास केल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा अंदाज आहे.
अपघातग्रस्त प्रवाशांना तात्काळ छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे दाखल करण्यात आले आहे.
रुग्णालयात दाखल झालेल्या जखमींवर युद्धपातळीवर उपचार सुरू असून वैद्यकीय अधीक्षक डॉ. माळगावकर यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर्सची टीम सतर्क आहे.
घटनास्थळी माजी नगरसेवक संजय वाघुळे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासीन तडवी, कळवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि अन्य अधिकारी उपस्थित होते. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून गर्दीच्या वेळी रेल्वेतील प्रवास किती धोकादायक होऊ शकतो, हे पुन्हा अधोरेखित झाले आहे.
"मुंब्रा-कळवा परिसरात झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. ठाणे ते डोंबिवली भागातील लोकसंख्या झपाट्याने वाढली, मात्र त्यानुसार वाहतूक व्यवस्था सक्षम करता आली नाही, ही बाब दु:खद आहे. त्यामुळेच फडणवीस सरकारने मेट्रो प्रकल्पांवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. पर्यायी रस्त्यांची क्षमता वाढवणे, ठाणे बायपासमार्गे दिवाला थेट रेल्वे जोडणी देणे, आणि सर्व लोकल डब्ब्यांची क्षमता १५ डब्यांपर्यंत वाढवणे – हे उपाय युद्धपातळीवर सुरू आहेत. यासाठी काही वर्षांचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत प्रवाशांनी संयम बाळगून शिस्त पाळावी, ही नम्र विनंती."— किरीट सोमय्या