ठाणे : लाडक्या गणरायाचा आगमन सोहळा अवघ्या काही दिवसांवर आला आहे. त्यामुळे मुंबईतील चाकरमान्यांची गणेशोत्सवासाठी गावी जाण्याची लगबग सुरु झाली आहे. कोकणात जाणार्या या चाकरमान्यांसाठी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर माझगाव-मुंबई ते विजयदुर्ग रो रो सेवा सुरू होणार आहे. ज्याचा मुहूर्तही आता ठरल्याचे समजते.
गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वी दोन-तीन दिवस आधी ही रो रो सेवा सुरु करण्याचा निर्णय महाराष्ट्र सागरी मंडळाने घेतला आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग बंदर विभागाकडून विजयदुर्ग जेटीवर युद्धपातळीवर याचे काम वेगाने सुरू आहे.
मुंबई ते मांडवा अशी रो रो सेवा देणार्या एम टू एम कंपनीची एक बोट मुंबई ते विजयदुर्ग या मार्गावर धावणार आहे. देवगड, मालवण, राजापुरला जाणार्या प्रवाशांसाठी ही बोट फायदेशीर ठरणार आहे. कोकण रेल्वेने हाच प्रवास करण्यासाठी 13- 14 तासांहून अधिक वेळ लागतो, जो आता अवघ्या सहा तासांवर येणार आहे. या रो रो सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास सागरी महामंडळाने व्यक्त केला आहे.
किती असेल तिकीट दर?
मुंबईवरून विजयदुर्गला येण्यासाठी या बोटीमध्ये जनरल प्रवाशी भाडे 600 ते 1000 रुपये इतके असेल तर गाडी भाडे 1500 ते 2000 पर्यंत असणार आहे. वरील दर हे अंदाजित आहेत. लवकरच दर निश्चित करुन जाहीर करण्यात येतील, अशी माहितीही महामंडळाकडून देण्यात आली आहे.