ठाणे : जुन्या भांडणातून विठ्ठल गायकर या तरुणाला कारखाली चिरडणाऱ्या संतोष पवार या मुख्य मारेकऱ्याला श्रीनगर पोलिसांनी ठाण्यातून सोमवारी अटक केली. या गुन्ह्यात आतापर्यंत तिघांना अटक करण्यात आले असून ते तिघे सख्खी भावंडे आहेत. तसेच अटकेतील संतोष याला येत्या २२ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
चहा पिण्यासाठी गेले असताना, जुन्या भांडणातून एका गटामधील चौघांनी दुसऱ्या गटातील वसंत टोकरे आणि बाबू बरफ या दोघांना शिवीगाळ करून मारहाण केली. याचदरम्यान अटकेतील संतोष पवार याने चारचाकी गाडी जोरात चालवून विठ्ठल गायकर याला कार खाली चिरडले. तसेच विठ्ठल यांना वाचविण्यासाठी गेलेले तक्रारदार शंकर वरठे यालाही गाडीने उडवले होते. दरम्यान कार खाली चिरडून गंभीररित्या जखमी झालेल्या विठ्ठल गायकर यांचा मृत्यू झाला असून तक्रारदार वरठे हे जखमी झाले आहेत.
याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर श्रीनगर पोलिसांनी महेश आणि अमित पवार या भावांना जेरबंद केले. तसेच या गुन्ह्यातील कार जप्त केली आहे. या घटनेत कार चालक संतोष आणि कारमधील बसलेला महेश पाटील हे दोघे पसार झाले होते. सोमवारी श्रीनगर पोलिसांनी संतोष याला अटक केली असून आद्यपही महेश हा पसार आहे.
संतोष याला न्यायालयात हजर केले असता, त्याला येत्या २२ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. तर महेश आणि अमित पवार हे दोघे न्यायालयीन कोठडीत आहेत. अटकेतील तिघे ही सखेभावंडे आहेत. याप्रकरणी पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुलझारीलाल फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.