ऐन सण उत्सावाच्या वेळेवर एसटी कर्मचार्‍यांच्या आंदोलनामुळे ठाण्यातील चाकरमान्यांची चांगलीच कोंडी झाली. pudhari news network
ठाणे

MSRTC Workers on Strike : एसटी कर्मचार्‍यांच्या आंदोलनामुळे ठाण्यातील चाकरमान्यांची कोंडी

ठाणे विभागातून कोकणासाठी 482 ज्यादा बसेस सोडणार

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : गणेश उत्सवाला अवघे काही दिवस उरले असताना एसटी कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या बेमुदत धरणे आंदोलनामुळे कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांची वाट खडतर झाली आहे. विविध मागण्यांसह प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी ठाणे एसटी आगार क्रमांक 1 येथे एसटी कर्मचार्‍यांनी मंगळवारी आंदोलन केले. ठाणे विभागातील ठाणे, कल्याण आणि विठ्ठलवाडी एसटी आगारातील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. आज, बुधवारी (दि.4) ठाणे विभागातून कोकणात जाणार्‍या 482 ज्यादा बसेस सोडण्यात येणार असून, आंदोलनामुळे या वाहतुकीवर परिणाम होणार आहे.

राज्य शासकीय कर्मचार्‍यांप्रमाणे राज्य परिवहन कामगारांना वेतन देण्यात यावे, कामगार कराराच्या तरतुदीनुसार शासकीय कर्मचार्‍यांना देय होणारा महागाई भत्याचा दर त्या तारखेपासून रा.प. कामगारांना लागू करण्यात यावा. या मागण्यांसाठी राज्यभर एसटी कर्मचार्‍यांकडून बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे. एसटीच्या ठाणे आगारातही एसटी कर्मचार्‍यांनी मंगळवारी धरणे आंदोन केले. ठाणे विभागातील ठाणे, कल्याण आणि विठ्ठलवाडी आगारातील एसटीची नियमित वाहतूक मंगळवारी पूर्ण बंद ठेवली होती. मात्र कोकणात जाणार्‍या ज्यादा वाहतुकीवर याचा परिणाम झाला नसल्याचे विभागातून सांगण्यात आले. ठाणे विभागातून कोकणात जाणार्‍या 33 जाद्या बसेस मंगळवारी (दि.3) सोडण्यात आल्या.

बस वाहतुकीसाठी आगाऊ झालेले बुकींग

मात्र, एसटी कर्मचार्‍यांची पुकारलेल्या या आंदोलनाचा परिणाम आज, बुधवारपासून कोकणात होणार्‍या ज्यादा वाहतुकीवर होणार असल्याची शक्यता आहे. आज, बुधवारी (दि.4) 482 बसेस कोकणात जाणार आहे. त्यांचे आरक्षण देखील करण्यात आले आहे. ज्यादा वाहतुकीसाठी राज्यातील इतर आगारातून देखील बसेस मागविण्यात आल्या आहेत. मात्र, आंदोलनामुळे बसेस वेळेत ठाणे आगारात दाखल न झाल्यास कोकणात गणेश भक्तांना घेवून जायचे कसे, असा पेच एसटी नियंत्रक विभागापुढे उभा ठाकला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT