MSRTC Food Complaint Pudhari
ठाणे

MSRTC Food Complaint: एसटीच्या ४० रुपयांच्या कूपनमध्ये एकच वडापाव-चहा! प्रवाशाची तक्रार; अधिकृत हॉटेल्सच्या नियमांवर प्रश्न

तक्रारीनंतरही ठकेदार तेच; अनेक पदार्थ उपलब्घ नसल्याचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

ठाणे: एसटी महामंडळाकडून प्रवाशांना चांगली सेवा मिळावी म्हणून एटी कॅन्टींगचे ठेके देताना नियमावली ठरवून दिली असताना एटी प्रवाशांना योग्य दरात चांगले खाद्य पदार्थ उपलब्ध करून देण्याच्या मुद्द्यालाच बगल दिली जात आहे. या बाबतच्या अनेक तक्रारी प्रवाशांनी नोंदवल्या आहेत. या प्रकारा बाबत भिवंडी येथील सचिन तुकाराम शिंदे यांनी तक्रार दिली आहे.

त्यांनी तक्रारीत म्हटले आहे की मी १५ ऑगस्ट २०२६ रोजी सातारा–भिवंडी या बसने प्रवास करत होतो. सायंकाळी सुमारे ७ वा. बस खोपोली एक्सप्रेस महामार्गावरील ‘निशिसागर फूड’ या MSRTC अधिकृत अल्पोपहार केंद्रावर थांबली.

तेथे मी ४० रुपयांचे कूपन घेऊन उपलब्ध नाश्त्याबाबत चौकशी केली असता, मला फक्त एक छोटा वडापाव आणि एक कप चहा उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार मी तो नाश्ता घेतला. मात्र, याबाबत शंका आल्याने मी तेथील व्यवस्थापकांकडे चौकशी केली. माझ्या माहितीनुसार, संबंधित कूपनअंतर्गत चहासोबत पोहे, उपमा, शिरा, बटाटा वडा, मेदू वडा, इडली हे पदार्थ उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे.

मी व्यवस्थापकांना याबाबत विचारणा केली असता सुरुवातीला त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यानंतर चर्चा व वादविवाद सुरू झाला. विशेष म्हणजे, मी घटनेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू केल्यानंतरच व्यवस्थापकांनी इडली उपलब्ध असल्याचे सांगितले व नवीन कूपन घेतल्यास इडली मिळू शकते, असे सांगण्यात आले.

जर इडली उपलब्ध होती, तर त्याची माहिती सुरुवातीलाच का देण्यात आली नाही? जर इडली उपलब्ध असल्याचे आधी सांगितले असते, तर आपण वडापाव घेतलाच नसता. तसेच, नियमांनुसार जर वडापाव आकाराने लहान असेल तर दोन वडापाव आणि मोठ्या आकाराचा असल्यास एक वडापाव देणे अपेक्षित आहे.

मात्र मला केवळ एक वडापाव देण्यात आला. एकाच कूपनअंतर्गत उपलब्ध असलेल्या पर्यायासाठी पुन्हा नवीन कूपन खरेदी करण्याची अपेक्षा करणे अन्यायकारक व नियमबाह्य आहे. आपण एका अधिकृत बस थांब्यावर कूपन व नाश्त्याबाबत चौकशी केली असता, हॉटेल व्यवस्थापनाने रात्री ८.०० नंतर कूपनद्वारे कोणताही नाश्ता उपलब्ध करून दिला जात नसल्याचे सांगितले. फक्त जेवणाची ऑर्डर देता येईल, असे त्यांनी सांगितले.

तथापि, MSRTC च्या नियमानुसार कूपन अंतर्गत उपलब्ध नाश्त्याचे पदार्थ प्रवाशांसाठी सर्व वेळ उपलब्ध असणे अपेक्षित आहे. हीबाब नियमभंगाची असल्याचे तक्रारदार सचिन शिंदे यांनी सांगितले.

अधिकृत हॉटेल्सनी प्रवाशांना नियमांमध्ये नमूद केलेले सर्व पदार्थ चांगल्या दर्जात, ताजे व खाण्यायोग्य अवस्थेत उपलब्ध करून देणे अपेक्षित असल्याचेही शिंदे यांनी सांगितले. याशिवाय, सर्व अधिकृत हॉटेलांमधील स्वच्छतेबाबतही गंभीर आरोप करत नाश्त्याचे पदार्थ उघड्यावर ठेवलेले असतात. त्यावर काचेचे आवरण किंवा संरक्षक जाळी नसते. परिणामी, अन्नपदार्थांवर माशा बसत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत असल्याची तक्रार भिवंडी बसस्थानकावर त्यांनी नोंदविली आहे.

अधिकृत थांबा हॉटेल्सची चौकशीची मागणी

MSRTC चे नियम व अटी सातत्याने मोडणाऱ्या अधिकृत थांबा हॉटेल्सची तातडीने चौकशी करण्यात यावी. चौकशीत नियमभंग सिद्ध झाल्यास अशा हॉटेलांची अधिकृत मान्यता रद्द करून त्यांच्या जागी सर्व नियम व अटींचे काटेकोर पालन करणाऱ्या हॉटेलांची नियुक्ती करण्यात यावी.

तसेच, सर्व अधिकृत थांबा हॉटेलांवर नियमित तपासणी यंत्रणा कार्यान्वित करून निर्धारित केलेले नियम, सेवा निकष, स्वच्छता मानके व प्रवासी सुविधा यांचे काटेकोर पालन होत आहे याची खात्री करण्यात यावी. तसेच नमूद केलेल्या प्रकरणावर आपण कोणती कार्यवाही केली आहे, याची माहिती मला देण्यात यावी. अशी मागणीही तक्रारदार सचिन शिंदे यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT