ST Bus file photo
ठाणे

MSRTC passenger safety issue : महाराष्ट्र राज्यमार्ग महामंडळाचा प्रवाशांच्या जीवांशी खेळ

पीयूसी, इन्शुरन्स, फिटनेस प्रमाणपत्राविना प्रवाशांची वाहतूक

पुढारी वृत्तसेवा

ठाणे ः ठाणे येथून कोल्हापूरला जाण्यासाठी वंदना स्थानकातून सोडण्यात आलेल्या शिवशाही बसचा फिटनेस संपून तीन वर्षे झाली आहेत. याशिवाय बस कुठल्याच बाबतीत परिपूर्ण नसताना एसटी महामंडळ अशा बसेस रस्त्यावर चालवून प्रवाशांच्या जीवाशी खेळ करत आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्य महामार्ग महामंडळाकडून चालवण्यात येणार्‍या बसेस सुस्थितीत आहेत का, यासाठी विशेष तपासणी मोहीम राबवित फिटनेससह वाहनाचा विमा, पीयूसी याची माहिती घेऊन एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन कायद्याचे सक्त पालन करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे ई-मेल द्वारे केली आहे.

शनिवारी पहाटे ठाण्यातून कोल्हापूरसाठी सोडण्यात आलेल्या शिवशाही बसमध्ये चालकाच्या समोरील तुटलेली काच, नादुरुस्त आसन व्यवस्था, अस्वच्छता, फाटलेल्या सीट, उखडलेले पत्रे, अशा नादुरुस्त बसमधून प्रवास करताना प्रवाशांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याने या बसच्या दुरवस्थेबाबत प्रवाशांनी ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांच्याकडे याबाबतची तक्रार केली करण्यात आली होती.

दरम्यान राहुल पिंगळे यांनी ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे. या घटनेने एसटी महामंडळाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला. परंतु या शिवशाही बसबाबत अधिक माहिती घेतली असता या बसचा फिटनेस संपून तीन वर्षे व इन्शुरन्स संपून चार वर्षापेक्षा अधिक कालावधी आणि पियूसी देखील नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे राहुल पिंगळे यांनी आरामदायी सेवेच्या नावाखाली नागरिकांचे जीव धोक्यात असल्याचे पत्राद्वारे सरनाईक यांच्या निदर्शनास आणले आहे.

धोकादायक बसचा वापर...

राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमध्ये प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा त्यांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठी वाहनाचे फिटनेस असणे गरजेचे आहे. कारण फिटनेस नसलेल्या सार्वजनिक बसचा अपघात झाल्यास विम्याचा लाभही मिळू शकत नाही, असे असताना फिटनेस, इन्शुरन्स, पियूसी नसलेली धोकादायक बस महामंडळाकडून प्रवाशांच्या आरामदायी सेवेच्या नावाखाली चालवून नागरिकांचे जीव धोक्यात घातले जात आहेत, ही बाब आपण परिवहन मंत्र्यांच्याही पत्राद्वारे निदर्शनास आणल्याचे पिंगळे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT