वाणगाव (ठाणे) : कालच निकाल जाहीर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा २०२४ परीक्षेत डहाणू तालुक्यातून दाभोण म्हसकरपाडा येथील कु. ॲड. प्रियंका अनंता म्हसकर या आदिवासीबहुल पालघर जिल्ह्यातील सह्याद्री टेकडीच्या दऱ्याखोऱ्यातील हरहुन्नरी आदिवासी कन्येने संपूर्ण आदिवासी मुली प्रवर्गातून राज्यात द्वितीय येण्याचा बहुमान पटकावला आहे. या निवडीने संपूर्ण जिल्ह्यांतील दऱ्याखोऱ्यांमध्ये पेसाक्षेत्रवासी आदिवासी बांधवांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे.
विशेष म्हणजे डहाणू तालुक्याच्या इतिहासाच्या ललाटी दऱ्या डोंगरकपारीतील प्रियंकाची क्लासवन अधिकारीपदी स्पर्धापरीक्षेत उत्तुंग भरारी प्रथमतःच नांव कोरत आहे. वाणगांव-बोईसरसारख्या आता कुठे विकसनशील शहराकडे वाटचाल करणाऱ्या ठिकाणांपासून पंधरा-वीस किलोमीटर पूर्वेकडे दाभोणच्या जंगलभागात अर्थात आदिवासी बहुल प्रतिकूल वस्तीत राहून प्रियंकाने मिळविलेले यश पंचक्रोशींत कुतुहलाचा विषय म्हणून चर्चिले जात आहे.
माझे हे यश दुर्दम्य चिकाटी व सातत्याने केलेल्या प्रयत्नांना मिळालेले यश आहे. या यशाने दोनवेळा हुलकावणी देऊनही म्हणजेच अपयशाने खचून न जाता संयमाने आणि सातत्याने केलेल्या कष्टाचे आज चीज झाले आहे. माझ्या ह्या यशात माझेआई-वडील, हायस्कूल वारघडेसर व ॲड. सागर वाकळेसर यांचा सिंहाचा वाटा आहे. मी हे यश विशेषतः मोबाईल व लॅपटॉप या ऑनलाइन माध्यमातून मिळवलेले आहे. तरी नवीन पिढीने सोशल मिडियाचा यथायोग्य कारणाकरता वापर करावा व यशाला तुमच्याकडे खेचून आणण्यास भाग पाडावे.कु. ॲड. प्रियंका म्हसकर, आदिवासी मुलींमध्ये राज्यातून द्वितीय.
कुटुंबातील आजी आजोबाअशिक्षित असून वडील अनंता म्हसकर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून फार मोठ्या कष्टाने वाट काढत प्रा. शिक्षक झाले अन सध्या केडीएमसीत अध्यापनाचे काम करत आहेत. आई अश्विनी म्हसकर गृहिणी आहे.