डोंबिवली : पश्चिम डोंबिवलीतील मोठागाव रेतीबंदर रेल्वे फाटक समर्पित जलदगती मालवाहू रेल्वे मार्गाच्या कामासाठी शनिवार आणि रविवार मध्यरात्री 12 वाजल्यापासून ते सकाळी 6 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. शुक्रवारपासून बंदची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. या कालावधीत वाहन चालकांनी जुन्या डोंबिवलीच्या पुलाखालून नवीन रेल्वे समांतर रस्त्याने मोठागाव-माणकोली पुलाकडे ये-जा करण्याचे आवाहन डोंबिवली शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराम पाटील यांनी केले आहे.
या संदर्भात वाहतूक नियंत्रण विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी अधिसूचना जारी केली आहे. शुक्रवारी मध्यरात्री 12 ते सहा या वेळेत या रेल्वे फाटकाजवळील समर्पित जलदगती रेल्वे मालवाहू मार्गिकेत खोदकाम, भराव आणि रेल्वेचे रूळ टाकण्याचे काम करण्यात आले. हेच काम शनिवार आणि रविवार मध्यरात्री 12 ते सकाळी सहा वेळेत केले जाणार आहे.
दिल्ली ते जेएनपीटी समर्पित जलदगती रेल्वे मालवाहू मार्गिकेचे काम गतीने सुरू आहे. या रेल्वे मार्गाची डोंबिवली, भिवंडी परिसरातील बहुतांशी कामे पूर्ण झाली आहेत. या रेल्वे मार्गातील बाधितांना मोबदला देऊन त्यांच्या जमिनीचे भूसंपादन करण्यात आले आहे.
या रेल्वे मार्गात मोठागाव रेतीबंदर रेल्वे मार्गावरील रेल्वे फाटक आडवे येत होते. डोंबिवली शहर परिसरातून मुंबई, ठाणे, भिवंडीला जाण्यासाठी प्रवासी मोठागाव रेल्वे फाटकाचा सर्वाधिक वापर करतात. त्यामुळे हे रेल्वे फाटक वाहनांनी गजबजलेले असते. या रेल्वे फाटकाजवळील मार्गिकेत शुक्रवारपासून टाटा प्रोजेक्टस लिमिटेडने समर्पित जलदगती मालवाहू रेल्वे मार्गिकेसाठी काम सुरू केले आहे. रविवारी सकाळी सहा वाजेपर्यंत हे काम सुरू राहणार आहे.
रेल्वे फाटक बंद राहणार असल्याने मध्यरात्री 12 ते सकाळी सहा वेळेत रेल्वे फाटकातून धावणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये. वाहन चालक, प्रवाशांनी पर्यायी रस्ते मार्गाचा अवलंब करावा म्हणून टाटा प्रोजेक्टस लिमिटेडच्या अधिकाऱ्यांनी वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराम पाटील यांच्यासह भाजपाचे दीपेश म्हात्रे यांची भेट घेतली. रेल्वे फाटक परिसराची त्यांनी एकत्रित पाहणी केली. या अनुषंगाने पुढील तीन दिवस रात्रीच्या सुमारास रेल्वे फाटक बंद ठेवण्याची माहिती देण्यात आली.
मध्यरात्रीच्या सुमारास मोठगाव-माणकोली पुलावरून वाहनांची वर्दळ कमी असते. त्यामुळे रेल्वे फाटक रस्ता बंद असला तरी वाहतुकीवर त्याचा परिणाम होणार नाही. सकाळी सात वाजल्यापासून ठाणे, मुंबईच्या दिशेने नोकरदार वर्ग अधिक संख्येने या मार्गाने जातो. सकाळी सहा वाजण्याच्या आत हे रेल्वे फाटक खुले होणार असल्याने या भागात वाहन कोंडी होणार नाही. रात्रीच्या वेळेत रेल्वे फाटक परिसरातील रस्ता, जुनी डोंबिवलीतील पूल मार्ग, नवीन रस्त्यावर वाहतूक पोलिसांचे नियोजन करण्यात आले आहे.
प्रवेश बंदमुळे पर्यायी रस्ता
माणकोली पुलावरून रेतीबंदर रेल्वे फाटकाकडे येणाऱ्या वाहनांना नवीन कोपर छेद रस्ता येथील जलकुंभ भागात प्रवेश बंद करण्यात आला आहे. ही वाहने उजवे वळण घेऊन नवीन कोपर वळण रस्त्याने जातील. डोंबिवलीतून रेल्वे फाटकाकडे जाणाऱ्या वाहनांना रेतीबंदर चौकात प्रवेश बंद कऱण्यात आला आहे. ही वाहने कोपर रस्ता, जुनी डोंबिवली पुलाखालून नवीन कोपर रस्त्याने माणकोली पुलाकडे जातील.