डोंबिवली : पश्चिम डोंबिवलीतील मोठागाव-माणकोली उड्डाण पूलाशी संलग्न असलेल्या दिवा-वसई रेल्वे मार्गावरील रेतीबंदर रोडला असलेल्या मोठागाव रेल्वे फाटकावर चारपदरी उड्डाण पूल बांधण्यास रेल्वे प्रशासनाने मंजुरी दिली आहे.
डोंबिवलीकरांना सतावणारा प्रश्न लवकरच निकाली निघणार आहे. हा पूल उभारल्यानंतर रेल्वे फाटकातील वाहतूक कोंडी आणि खोळंब्याला पूर्णविराम मिळणार आहे. या पुलाच्या बांधकामासाठी 168 कोटीचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. शिवाय या निधीतून भूसंपादनासह पोहोच रस्त्याचे बांधकाम करण्यात येणार आहे. या प्रकल्पातील बाधित 600 रहिवाशांच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे. या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या शासकीय निधीला प्रशासकीय मान्यता देण्याची मागणी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
मोठागाव-माणकोली उड्डाण पुलावर वाहतुकीचा प्रचंड ताण वाढला आहे. ही सर्व वाहने मोठागावच्या फटकात आल्यावर लांब पल्ल्याच्या मेल/एक्स्प्रेससह मालगाड्या जाईपर्यंत रेल्वे फाटकात दुतर्फा अडकून पडतात. या फाटकावरील उड्डाण पुलाची गरज लक्षात घेऊन उपयुक्तता विचारात घेऊन दोन वर्षांपूर्वी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने शासनाकडे निधीची मागणी केली होती. याला अनुसरून शासनाने 168 कोटीचा निधी मंजूर केला आहे. या निधीला प्रशासकीय मान्यता द्यावी, अशी मागणी केडीएमसीने जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडे केली आहे.
डोंबिवलीच्या शहर आणि ग्रामीण पट्ट्यातून मुंबई-ठाण्याचे अंतर कमी करण्यासह कल्याण-शिळ महामार्ग, दुर्गाडी, कोन ते भिवंडी बाह्यवळण रस्त्यावरील कोंडीतून मुक्तता करण्यासाठी बहुतांशी प्रवासी डोंबिवली शहरात येऊन मोठागाव-माणकोली उड्डाण पूलमार्गे ठाणे, मुंबई, मुंब्रामार्गे नवी मुंबई, पनवेलकडे जाण्यास प्राधान्य देत आहेत. मोठागाव-माणकोली उड्डाणपुलावर जाण्यासाठी डोंबिवली शहरातून रेतीबंदर मोठागाव रेल्वे फाटकातून जावे लागते. हा रेल्वे मार्ग दिवा-वसई, वसई-पनवेल शहरांना जोडला आहे.
चकाचक मंदिराजवळ पूश-थ्रू बोगदा
24 मीटर रस्त्याचे भूसंपादन करण्यासाठी 72 कोटी 75 लाख, पुलाचे बांधकाम करण्यासाठी 5 कोटी 58 लाख, पुलाच्या पोहोच रस्त्यांसाठी 84 कोटी, देवीचा पाड्यातील चकाचक मंदिराजवळ पुश-थ्रू बोगद्यासाठी 3 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. रेल्वे फाटकावरील उड्डाण पूल दोन ऐवजी चार पदरी करावा यासाठी केडीएमसीसह आपण पाठपुरावा केला होता. त्याला आता यश आले आहे. या पुलामुळे बाधित होणाऱ्या 600 बाधितांना 68 कोटीची भरपाई दिली जाणार आहे. या पुलाचे काम लवकर सुरू होईल यादृष्टीने रेल्वेकडे पाठपुरावा करणार असल्याचे उबाठाचे जिल्हाध्यक्ष दीपेश म्हात्रे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
दोन वर्षांच्या तगाद्याला यश
रेतीबंदर रोडला असलेल्या मोठागाव रेल्वे फाटकावर चार पदरी उड्डाण पूल उभारणीसाठी मंजुरी देण्याची मागणी दोन वर्षांपूर्वी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने रेल्वे प्रशासनाकडे केली होती. तथापि रेल्वे प्रशासन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या या मागणीला दाद देत नव्हते. अखेर शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी रेल्वे प्रशासनासह शासनाकडे पाठपुरावा सुरू केला. मूलभूत सोयी आणि सुविधा विकास योजनेंतर्गत शासनाने या पुलासाठी 168 कोटीचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून 30 कोटी रुपये भूसंपादनासाठी, या पुलाच्या पोहोच रस्त्यामुळे बाधित होणाऱ्या 600 रहिवाशांच्या पुनर्विकासासाठी 138 कोटी मंजूर करण्यात आले आहेत.