पालिका शाळेतील मुलींना मिळणार मासिक उपस्थिती भत्ता pudhari photo
ठाणे

Monthly stipend for girl students : पालिका शाळेतील मुलींना मिळणार मासिक उपस्थिती भत्ता

शासन निर्णयाच्या अनुषंगाने आयुक्तांचा निर्णय

पुढारी वृत्तसेवा

भाईंदर : राज्य शासन निर्णयानुसार मुलींच्या शिक्षणास प्रोत्साहन देण्याच्या सकारात्मक दृष्टीकोनातून मिरा-भाईंदर महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी पलिका शाळेतील इयत्ता 8 वी ते 10 वी तील मुलींना शाळेत नियमित उपस्थिती दर्शविण्याच्या अनुषंगाने मासिक 300 रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय घेतला आहे.

यामुळे त्या इयत्तांमधील विद्यार्थिनींसह पालकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून त्यांनी मुलींना नियमित शिक्षण देण्याच्या अनुषंगाने शाळेत 100 टक्के उपस्थित राहण्यासाठी आपल्या मुलींना प्रोत्साहित करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत पालिका शाळेतील हजेरीपटावर नोंदणी असलेल्या व शाळेत नियमित उपस्थित राहणार्‍या इयत्ता 8 वी ते 10 वी मधील मुलींना मासिक 300 रुपये उपस्थिती प्रोत्साहन लागू करण्यात येणार आहे. यासाठी राज्य शासनाने 23 मार्च 2022 रोजी जारी केलेल्या निर्णयाचा आधार घेण्यात आला आहे. पालिका शाळेतील इयत्ता 8 वी ते 10 वी मधील मुलींच्या गळतीचे प्रमाण कमी व्हावे. पालकांनी आपल्या मुलींना नियमित शाळेत पाठवावे, या हेतूने प्रोत्साहन भत्ता लागू करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

या योजनेचा लाभ माध्यमिक शाळेतील इयत्ता 8 वी ते 10 वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलींकरीता लागू करण्यात येणार असून चालू शैक्षणिक वर्षातील शाळेत एकूण उपस्थितीच्या तुलनेत किमान 220 दिवसांची उपस्थिती गृहीत धरण्यात येणार आहे. निश्चित उपस्थितीनुसारच मुलींना प्रोत्साहन भत्ता लागू करण्यात येणार असून हा भत्ता लाभार्थी विद्यार्थिनीला डिबीटीच्या माध्यमातून तिच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे. ही योजना पालिका शाळेतील मुलींची उपस्थिती वाढविण्याच्या अनुषंगाने ऑगस्ट 2025 ते जुलै 2026 या एक वर्षाच्या कालावधीकरीता प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येणार आहे.

भविष्य होणार अधिक सुरक्षित

मुलींच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने पालिकेमार्फत हा उपक्रम राबवला जात आहे. मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण अधिक महत्त्वाचे असून शिक्षणामुळे मुलींना सशक्त आणि आत्मनिर्भर बनण्यास मदत होईल. तसेच शाळेतील नियमित उपस्थितीमुळे मुलींच्या ज्ञान आणि कौशल्यात वाढ होऊन त्यांचे भविष्य अधिक सुरक्षित होईल, असा दावा आयुक्तांकडून करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT