ठाणे : स्टेशन परिसरातील भंडारआळी येथे शुक्रवारी (दि.11) दुपारी एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे विनयभंग करणारा स्थानिक पदाधिकारी सचिन यादव (55) शिंदेच्या शिवसेनेचा पदाधिकारी आहे. विनयभंग करणार्याला जामीन देखील झाल्याने भाजपच्या महिला मोर्चाच्या पदाधिकार्यांनी ठाणे नगर पोलीस ठाण्यात धाव घेत घेराव घातला. या प्रकरणी जामीन रद्द करून सचिन यादववर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, ठाण्यात देखील ‘बदलापूर रिटर्न’ घडल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
राज्यात महिला आणि चिमुरड्या मुलींवर अत्याचार होत असलेल्या घटना वाढल्या आहेत. ठाण्यातील भंडारआळी परिसरातील इमारतीमध्ये शुक्रवारी दुपारी एका नऊ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ठाणे येथील भंडारआळी परिसरात पिडीत मुलगी राहते. ती इयत्ता सातवीत शिकत असून नाराधम सचिन यादव हा देखील भंडारआळी परिसरात राहतो. शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास परिसरातील इमारतीत सचिनने पीडित मुलीचा विनयभंग केला. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून सचिनला अटकही केली. मात्र थातूरमातूर गुन्हा दाखल केल्याने नाराधामाची लगेच सुटका झाली असल्याने या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या घटनेने ठाण्यात एकच खळबळ उडाली असून या नराधमाला जामीन झाला कसा? असा संतप्त सवाल पीडित मुलीच्या पालकांनी केली आहे. दरम्यान सचिन यादव याच्यावर पोक्सो अंतर्गत कठोर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
पोलिसांनी अटक केलेला यादव याला जामीन मिळाला याच्या निषेधार्थ रविवारी संध्याकाळी भाजप महिला मोर्चाच्या महिला एकवटल्या. गंभीर घटना असल्याने महिला थेट ठाणे नगर पोलीस ठाण्यावर धडकल्या. आरोपी नराधमाला जामीन कसा मंजूर झाला याचा जाबही त्यांनी वरिष्ठ पोलिसांना विचारला. तसेच या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा ही महिलांनी दिला. यावेळी भाजपाच्या माजी नगरसेविका नम्रता जयेंद्र कोळी, सुनील हंडोरे यांच्यासह नागरिकांनी ठाणे नगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विजयकुमार देशमुख यांची भेट घेतली. आरोपी नराधमाचा जामीन रद्द करण्यासाठी सत्र न्यायालयात अपील करण्याची मागणी केली. या वेळी भाजपाच्या महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा स्नेहा पाटील, नौपाडा मंडल अध्यक्ष विकास घांग्रेकर, नौपाडा महिला मोर्चाच्या अध्यक्षा वृषाली वाघुले उपस्थिती होते.