Dengue
डेंग्यू प्राणघातक आहे Pudhari News Network
ठाणे

Thane News | मोखाडा तालुका डेंग्यूच्या विळख्यात

पुढारी वृत्तसेवा
खोडाळा : दीपक गायकवाड

मोखाडा तालुक्यात 2024 या नववर्षाची सुरूवात डेंग्यूच्या साथीने झाली आहे. प्रत्येक महिन्यात डेंग्यूचे रूग्ण आढळून आले आहेत. डेंग्यूला अटकाव करण्यास प्रशासन अपयशी ठरल्याने, नागरीक हवालदिल झाले आहेत. सरकारी अहवालावरून जानेवारी ते जुन या सहा महिण्यात तालुक्यात डेंग्यूचे 24 रूग्ण आढळून आले आहेत. तसेच मोखाडा ग्रामीण रूग्णालयात जुन आणि जुलै च्या पंधरवाड्यात 3 असे एकूण 27 रूग्ण आढळून आले आहेत. तर खासगी दवाखान्यात ऊपचार घेणार्‍या रूग्णांची संख्या यापेक्षा दुपटीनेही अधिक आहे. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून मोखाडा तालुका डेंग्यूच्या विळख्यात आहे.

मोखाड्यात प्रत्येक महिन्यात आढळलेले डेंग्यूचे रुग्ण

स्वच्छ भारत मिशन योजनेचा बोजवारा उडालेल्या मोखाडा तालुक्यात डेंग्यूच्या आजाराने डोकेवर काढले आहे. जानेवारी महिन्यापासून मोखाड्यात प्रत्येक महिन्यात डेंग्यूचे रूग्ण आढळून येत असल्याचे सरकारी अहवालावरून समोर आले आहे. आरोग्य विभागाकडून प्रत्येक महिन्यात आरोग्य केंद्रात येणार्‍या रूग्णांची रक्त चाचणी करण्यात आली आहे. उघडी गटारे, तुंबलेला पाणी साठा, गावापाड्यांमध्ये कचरा व्यवस्थापनाचा अभाव, पसरलेले घाणीचे साम्राज्य यामुळे प्रत्येक महिन्यात तालुक्यात डेंग्युचे रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असुन, त्यांनी डेंग्यूला अटकाव करण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. तालुक्यातील चार प्राथमिक आरोग्य केंद्र आणि एका ग्रामीण रूग्णालयात थंडी, तापाचे रूग्ण मोठ्या प्रमाणात येत आहेत. या व्यतिरिक्त खासगी दवाखान्यात रूग्णांची गर्दी जास्त दिसून येते आहे.आरोग्य केंद्रात जानेवारी ते जून या काळात 15 हजार 92 डेंग्यू संशयित रूग्णांचे रक्त नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. त्यामध्ये 24 रूग्ण डेंग्यूने बाधित असल्याचे समोर आले आहे.

डेंग्यूला आळा घालण्यासाठी आरोग्य कर्मचारी यांचेमार्फत कंटेनर सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. तसेच कोरडा दिवस पाळणे, जनजागृती करणे, संशयित रुग्णांची तपासणी करुन योग्य तो औषधोपचार करण्यात येत आहे. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची तपासणी, स्थलांतरीत होऊन आलेल्यांची प्राधान्याने तपासणी करण्यात येत आहे.
डॉ. भाऊसाहेब चत्तर, तालुका आरोग्य अधिकारी, मोखाडा.
SCROLL FOR NEXT