मोखाडा : गेल्या काही वर्षांत जव्हार आणि तलासरी येथे मोठ्या प्रमाणात भूकंपाचे धक्के बसल्याचे जाणवले होते यांनतर प्रशासनाने अनेक तपासण्या केल्या खर्या मात्र याचे नंतर काय झाले हे मात्र किती लोकांना समजले हा संशोधनाचा विषय बनला आहे मात्र आता मोखाडा तालुक्यातील घानवळ या ठिकाणी गुरुवारी 26 रोजी सायंकाळी 7 वाजेच्या आणि रात्री 9 वाजून 13 मिनिटांनी गावाला सौम्य धक्का जाणवला. यामुळं लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
काही महिन्यापूर्वी सुध्दा दोन ते तीनवेळा हा प्रकार घडल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले आहे. यामुळे हा नेमका काय प्रकार आहे याबाबत आता तर्क लावले जात आहेत. मुळात भूकंपाला थांबवू शकेल अशी यंत्रणा किंवा भूकंप झाल्यास ते सावरण्यासाठीची यंत्रणा मोखाडा तालुक्यात अजिबातच उपलब्ध नाही किंवा कुठे कंप झाला, हादरे बसले हे कळण्यासाठीची देखील यंत्रणा उपलब्ध नाही. यामुळे ज्या ठिकाणी अशी घटना घडली तेथील नागरीक सांगतील तेव्हाच सरकारी यंत्रणेला याची माहिती कळणार आहे. यामुळे भूकंपसारख्या मोठ्याप्रकाराबाबत प्रशासन अनभिज्ञ असल्याचे दिसून येते यातूनच मात्र गावातील तरुणांनी याबाबत रात्री समाज माध्यमांवर असे मेसेज टाकल्यानंतर ही बाब निदर्शनास आली अगदी काल रात्री किंवा त्या अगोदरही असे सौम्य हादरे बसल्याचे कळते यामुळे ही घटना गंभीर असून यावर प्रशासनाने दखल घेणे आवश्यक बनले आहे.
याबाबत येथील तरुण मनोज वारघडे यांनी सांगितले की, रात्री 9 वाजून 13 मिनिटांनी घानवळ गावाला भूगर्भामध्ये सौम्य असा हादरा बसला. गेल्या काही महिन्यांपूर्वी 2-3 वेळा घडले होते आणि आताही 2 वेळा घडले आहे. हे नक्की असे का घडते आहे? याचा आपल्या भागात सखोल अभ्यास - संशोधन करून यावर योग्य तो उपाय करणे गरजेचे आहे. एखादी मोठी घटना घडण्यापेक्षा त्यावर वेळीच सावध झाले पाहिजे. सध्या होणारे भूगर्भातील जमिनीला हादरे यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे.