नेवाळी : "तुमचा दादा जेव्हा रिक्षा चालवत होता, तेव्हा मी मर्सिडीज मध्ये फिरत होतो. मी खानदानी आहे. टेंडरच्या पैशातून गाड्या-घोडे उभे करून माज दाखवणाऱ्यांनी आम्हाला शिकवण्याची गरज नाही," अशा शब्दांत मनसेचे नेते राजू पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष, डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. कोविड काळातील डोंबिवलीतील रुग्णालय, वैद्यकीय सुविधा, पक्षांतर, भाजपच्या कार्यपद्धतीसह आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे.
डोंबिवलीत शुक्रवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कल्याण ग्रामीण आणि डोंबिवली विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना पाटील यांनी रवींद्र चव्हाण यांच्यावर नाव घेऊन अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून डोंबिवलीतील रुग्णालयाच्या मुद्द्यावरून झालेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत भाजपवर प्रतिहल्ला चढवला आहे.
"महापालिकेच्या सत्तेत आम्ही अवघे सहा महिने आहोत. आमच्या कामाचा हिशोब आम्हाला पाच वर्षांनंतर विचारा. पण गेली तीस वर्षे सत्ता उपभोगणाऱ्यांनी डोंबिवलीला काय दिले, याचा जाब आधी विचारला पाहिजे," असे सांगत पाटील यांनी रवींद्र चव्हाण यांच्याकडे थेट बोट दाखवले. "ते वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री होते. मग डोंबिवलीच्या दवाखान्यासाठी त्यांनी कोणती ठोस कामे केली? नागरिकांच्या तक्रारींवर त्यांनी काय उपाययोजना केल्या? याचे उत्तर त्यांनी द्यावे," अशी मागणी त्यांनी केली आहे.
कोविड काळातील परिस्थितीची आठवण करून देताना पाटील म्हणाले, "त्या काळात लोक भीतीच्या सावटाखाली जगत होते. अनेक खासगी रुग्णालयांमध्ये गोंधळाचे वातावरण होते. अशा वेळी मी स्वतः आयुक्तांशी संपर्क साधून आमचे संपूर्ण हॉस्पिटल महापालिकेच्या ताब्यात देण्याची तयारी दर्शवली. आम्ही डॉक्टर नाही, संस्थेला चालवण्यासाठी हॉस्पिटल दिले आहे. जनतेच्या जीवापेक्षा मोठे काहीच नाही, या भूमिकेतून आम्ही निर्णय घेतला. त्या निर्णयामुळे आर्थिक नुकसान झाले, पण त्याची तमा बाळगली नाही."
याच मुद्द्यावरून भाजपकडून करण्यात आलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना ते म्हणाले, "कोविडमध्ये दहा लाखांचे भाडे घेतले, असे आरोप केले जात आहेत. पण त्यामागची वस्तुस्थिती कोणी सांगत नाही. त्या काळात लाखो रुपये खर्च केले, सहकाऱ्यांनी मदतकार्य केले, नागरिकांना किट वाटल्या. केलेली मदत मिरवण्याची आमची सवय नाही. मात्र अर्धसत्य पसरवून जनतेची दिशाभूल करणाऱ्यांना उत्तर देणे गरजेचे आहे."
पक्षांतर करणाऱ्या माजी महाराष्ट्र सैनिकांवर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. "आमचा पक्ष सोडून गेलेल्यांपैकी कोणीही विनाकारण गेलेला नाही. कोण किती पॅकेज घेऊन गेला, याची संपूर्ण माहिती माझ्याकडे आहे. इतक्या वर्षांचे संबंध असल्यामुळे मी गप्प बसलो आहे. पण वारंवार आमच्या पक्षाला लक्ष्य केले, तर योग्य वेळी सर्व गोष्टी जनतेसमोर मांडेन. मग कोणाचीही पर्वा करणार नाही," असा इशारा त्यांनी दिला आहे.
कार्यकर्त्यांना संयम बाळगण्याचा सल्ला देताना त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, "विरोधक टीका करतील, ट्रोल करतील; पण शहरातील राजकीय वातावरण बिघडेल असे कोणतेही कृत्य करू नका. उत्तर द्या, पण मुद्द्यांवर द्या. डोंबिवलीची राजकीय संस्कृती बिघडता कामा नये." अस पाटील यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं आहे.
यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना आगामी काळात लोकहिताचे प्रश्न अधिक आक्रमकपणे मांडण्याचे आवाहन केले. "महागाई, पेट्रोल-डिझेलचे वाढते दर, नीट परीक्षेतील गोंधळ, शहरातील पायाभूत सुविधांचे प्रश्न, एसएआरची मुदतवाढ, विकास आराखडा यांसारखे अनेक विषय जनतेसमोर आहेत. या प्रश्नांवर लढा उभा करा. विरोधकांच्या प्रत्येक वक्तव्याला उत्तर देण्यात वेळ वाया घालवू नका," असे ते म्हणाले आहेत.
मतदारसंघ पुनर्रचनेच्या पार्श्वभूमीवर मनसेची ताकद वाढविण्याचा निर्धार व्यक्त करताना पाटील म्हणाले, "कल्याण ग्रामीण ही फक्त झलक आहे, डोंबिवली अजून बाकी आहे. पुनर्रचनेनंतर वाढणाऱ्या प्रत्येक मतदारसंघात मनसेची ताकद दिसली पाहिजे. राज ठाकरे यांनी कल्याण-डोंबिवलीवर कायम विश्वास ठेवला आहे. तो विश्वास सार्थ ठरवण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने जोमाने कामाला लागावे," असे आवाहनही त्यांनी केले आहे.