नेवाळी (ठाणे) : कल्याण-डोंबिवली शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा एकदा ‘मराठी अस्मिता’चा मुद्दा आक्रमकपणे पुढे आणला आहे. रिक्षांवर “मी मराठी बोलतो, मला मराठी समजते, या माझ्या रिक्षात बसा” अशा आशयाचे स्टिकर लावण्याची मोहीम सुरू केली आहे. आगामी ४ मे रोजी मराठी शक्ती विरोधात आंदोलन करणाऱ्यांना आपल्या खास मनसे स्टाईलने उत्तर देण्याचा इशारा देत ही मोहीम राबवण्यात येत आहे.
मनसे पदाधिकाऱ्यांनी शहरातील विविध भागात जाऊन रिक्षाचालकांना स्टिकर वाटप करत ते रिक्षांवर लावण्याचे आवाहन केले आहे. या मोहिमेला रिक्षाचालकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून अनेकांनी स्वयंस्फूर्तीने स्टिकर लावले आहेत. विशेष म्हणजे परप्रांतीय रिक्षाचालकांनीही या उपक्रमात सहभागी होत मराठी भाषेचा सन्मान राखणार असल्याचा संदेश यावेळी दिला आहे.
यावेळी मनसेचे उपजिल्हाध्यक्ष योगेश पाटील,शहर संघटक तकदिर काळण आणि पदाधिकारी आरिफ शेख यांनी पुढाकार घेत रिक्षाचालकांशी संवाद साधला आहे. “महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठी भाषा येणे आणि तिचा आदर करणे आवश्यक आहे,” असे स्पष्ट करत त्यांनी सर्व चालकांना मराठीत संवाद साधण्याचे आवाहन केले आहे.
मनसेच्या या मोहिमेमुळे शहरात पुन्हा एकदा मराठी अस्मितेचा मुद्दा चर्चेत आला असून, आगामी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. रिक्षांवरील हे स्टिकर केवळ ओळख नसून मराठीच्या सन्मानासाठीचा ठाम संदेश असल्याची भावना मनसे कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.