Kalyan Dombivli auto strike
डोंबिवली : मनसेने ४ मे रोजी प्रस्तावित रिक्षा संपाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत कल्याण-डोंबिवलीत ‘मी मराठी बोलतो’ या आशयाची स्टिकर मोहीम सुरू केली आहे. संपाच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून ‘खळ्ळ...खट्याक्’ इशारा देत राजकीय वातावरण तापवले आहे.
मराठी भाषा आणि अस्मितेच्या मुद्द्यावर मनसेने ही मोहीम हाती घेतली असून, रिक्षांवर ‘मला मराठी समजते, माझ्या रिक्षात बसा’ असे स्टिकर्स लावले जात आहेत. विशेष म्हणजे या उपक्रमाला अमराठी रिक्षाचालकांचाही प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.
हा उपक्रम माजी आमदार राजू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत मराठी भाषेचा सन्मान राखला जावा आणि प्रवाशांना भाषेची अडचण येऊ नये, हा या मोहिमेमागचा उद्देश असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. या मोहिमेत मनसे पदाधिकारी, राजसैनिक तसेच रिक्षाचालक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
कल्याण-डोंबिवली परिसरात मराठी भाषेच्या मुद्द्यावरून वातावरण तापण्याची चिन्हे दिसत असून, ४ मे रोजी काही संघटनांनी पुकारलेल्या संपाला मनसेने तीव्र विरोध दर्शवला आहे. “संपावर ठाम असणाऱ्यांना मनसे आपल्या शैलीत उत्तर देईल,” असा इशाराही देण्यात आला आहे.
रेल्वे स्थानक परिसरातील रिक्षा स्टँडवर जाऊन स्टिकर्स लावण्याची मोहीम राबवण्यात आली. ‘मी मराठी बोलतो, मला मराठी समजते, माझ्या रिक्षात बसा’ अशा संदेशांद्वारे प्रवाशांनी मराठी बोलणाऱ्या रिक्षाचालकांना प्राधान्य द्यावे, असा उद्देश असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे अनेक परप्रांतीय रिक्षाचालकांनीही स्वेच्छेने सहभाग घेत मराठी भाषेचा सन्मान राखण्याचा संदेश दिला. महाराष्ट्रात काम करताना स्थानिक भाषा व संस्कृतीचा आदर करणे आवश्यक असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
दरम्यान, “महाराष्ट्रात राहून मराठी भाषेचा अपमान सहन केला जाणार नाही,” असा थेट इशारा मनसेकडून देण्यात आला असून, ४ मे रोजीचा संप यशस्वी ठरणार की मनसेच्या या मोहिमेमुळे रिक्षा सेवा सुरू राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.