ठाणे/ भिवंडी : भिवंडी शहरातील वाढत्या लोकसंख्येच्या परिवहन सेवेच्या गरजा भागविण्यासाठी कल्याण-भिवंडी मेट्रो लाईन प्रकल्प राबविण्यात येत आहे. भिवंडी शहरात वाढती लोकसंख्या, मालवाहतूकदारांची मोठी संख्या यामुळे कायमच वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो.
येथील वाहतूककोंडीवर कायमस्वरूपी तोडगा निघण्याकरीता आणि शहराच्या सर्वांगीण, वेगवान पायाभूत विकासासाठी भूमीगत मेट्रोसह रस्ता रूंदीकरण व नवीन उड्डाणपूल निर्मितीचा स्वतंत्र प्रकल्प राबविण्याचा निर्णय ठाणे-कल्याण-भिवंडी मेट्रो मार्ग क्रमांक 5 च्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे.
पायाभूत सोयी सुविधांच्या प्रकल्पांमुळे भिवंडी शहराच्या विकासाला गती मिळणार असून या प्रकल्पांसाठी शासन निधी उपलब्ध करून देईल. भिवंडी शहरात मेट्रोच्या कामासोबतच रस्ता रूंदीकरण प्रकल्पाचे कामही सुरू करण्यात यावे. भिवंडी शहरातील नागरिकांची या प्रकल्पांच्या पूर्णत्वानंतर वाहतूककोंडीच्या समस्येतून कायमस्वरूपी सुटका होणार आहे, भिवंडीवासियांसाठी मेट्रो प्रमाणेच रस्ता रुंदीकरण प्रकल्पही महत्वाचा आहे. त्यामुळे दोन्ही प्रकल्पांचे काम सोबतच सुरू करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. या प्रकल्पांमुळे भिवंडी शहरातील दळणावळणाला गती येणार असल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले, या भागातील औद्योगिक विकासालाही चालना मिळणार आहे. या मेट्रो प्रकल्पाचा विस्तार आता कल्याणच्या पुढे उल्हासनगरपर्यंत होत आहे. उल्हासनगरच्यापुढे अंबरनाथ जवळील चिखलोली उपनगरीय रेल्वे स्थानकापर्यंत विस्तार करण्याबाबत अभ्यास करण्यात येत आहे. यामुळे अंबरनाथ, उल्हासनगर, शहाड आणि आजूबाजूच्या परिसरातील लाखो रहिवाशांना मुंबई आणि ठाणे या प्रमुख शहरी केंद्रांपर्यंतचा प्रवास अधिक जलद होणार आहे. मेट्रोचे काम करताना ‘डिप टनेल’ तंत्रज्ञान वापरून बोगदा तयार करण्याच्या कामाची पडताळणी करावी. तसेच दुहेरी बोगदा तंत्रज्ञान वापरून रस्ता व मेट्रो मार्ग तयार करण्याच्या कामाचाही अभ्यास करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
लांबी: एकूण 34.23 किमी. यात मेट्रो मार्ग -5 टप्पा 1 (11.90 किमी), मेट्रो मार्ग -5 टप्पा 2 (10.5 किमी) आणि मेट्रो मार्ग -5अ (11.83 किमी) यांचा समावेश आहे.
स्थानके : 19 स्थानके (1 भूमिगत व उर्वरित उन्नत)
ट्रेनची रचना : 6 डब्यांची ट्रेन.
प्रस्तावित डेपो : काशेळी येथे (26.93 हेक्टर).
इंटरचेंज स्थानके: कल्याण स्थानक (मेट्रो मार्ग 12 सह) आणि कापूरबावडी (मेट्रो मार्ग 4 ).
प्रकल्पाची अंदाजित किंमत
मेट्रो मार्ग 5 : 8417 कोटी व मेट्रो मार्ग 5 अ : 4063 कोटी