Eknath Shinde File Photo
ठाणे

Eknath Shinde: एमएमआरमध्ये १५ वर्षांत ३० लाख घरे उभारणार: एकनाथ शिंदेंची घोषणा

मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) राज्य सरकारने पुढील १५ वर्षांत तब्बल ३० लाख घरे निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवले असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

पुढारी वृत्तसेवा

Eknath Shinde

ठाणे : मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) वाढती लोकसंख्या आणि घरांची गरज लक्षात घेता, राज्य सरकारने पुढील १५ वर्षांत तब्बल ३० लाख घरे निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात घरांची निर्मिती करणे ही काळाची गरज असून, सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार आणि आधुनिक घरे उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

क्लस्टर योजनेअंतर्गत सिद्धेश्वर तलाव परिसरातील प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्यात ते बोलत होते. सिद्धेश्वर क्लस्टर प्रकल्पाचे काम तीन वर्षांत पूर्ण करून नागरिकांना घरांच्या चाव्या द्या, असे निर्देश त्यांनी संबंधित विकासकांना दिले. सिद्धेश्वर तलाव परिसरातील झोपडपट्टीत सुमारे सहा हजार नागरिक राहत असून, अनेक वर्षांपासून रखडलेल्या पुनर्विकासाला आता मुहूर्त मिळाला आहे. ‘सुगी डेव्हलपर्स’ या प्रकल्पाची अंमलबजावणी करणार आहे. नागरिकांचे राहणीमान उंचावणे हा क्लस्टर योजनेचा मुख्य उद्देश असून, विकासकांनी नफ्यापेक्षा नागरिकांना चांगली घरे देण्याला प्राधान्य द्यावे, असे आवाहन शिंदे यांनी केले.

क्लस्टर प्रकल्पांमध्ये नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. ठाण्यातील किसननगर, लकी कंपाऊंड आणि इतर भागांमध्ये जुन्या व धोकादायक इमारती कोसळून नागरिकांचे जीव गेल्याचा संदर्भ देत शिंदे यांनी पुनर्विकासाची गरज अधोरेखित केली. किसननगरमधील साईराज इमारत दुर्घटनेनंतर जुन्या आणि धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सातत्याने मांडला. ‘आमदार म्हणून मी अनेकदा आंदोलन केले, ‘चलो आझाद मैदान’ चा नारा दिला. अखेर मी मुख्यमंत्री असताना क्लस्टर योजनेला गती मिळाली,’ असे त्यांनी सांगितले.

या प्रवासात जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेकांनी साथ दिल्याचेही शिंदे यांनी नमूद केले. क्लस्टरच्या पहिल्या टप्प्यातील काम पूर्णत्वाकडे असून, लवकरच नागरिकांच्या हातात घरांच्या चाव्या देण्यात येतील. तो दिवस आनंदाचा असेल, असेही ते म्हणाले.

एमएमआरमधील ठाणे, मुंबई, मीरा-भाईंदर, उल्हासनगर, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवलीसह विविध भागांमध्ये क्लस्टर आणि पुनर्विकासाच्या माध्यमातून घरांची निर्मिती केली जाणार आहे. झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण (एसआरए), म्हाडा आणि सिडको यांच्या माध्यमातूनही विविध प्रकल्प राबविले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

क्लस्टर प्रकल्पांमध्ये आधुनिक तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा आणि पर्यावरणाचा समतोल साधण्यावर भर दिला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्मार्ट सिटी संकल्पनेशी सुसंगत असा विकास क्लस्टरच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न असल्याचे शिंदे यांनी सांगितले. ठाणे महापालिका या प्रकल्पांसाठी कुठेही कमी पडणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. ठाणे हे तलावांचे शहर असून, अनेक तलावांचे पुनरुज्जीवन आणि स्वच्छता करण्यात आली आहे. विकास करताना पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असे त्यांनी नमूद केले.

“कोशिश करने वालों की हार नहीं होती,” या हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेतील ओळींचा उल्लेख करत शिंदे यांनी, क्लस्टरच्या माध्यमातून नागरिकांचे अनेक वर्षांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला. भूमिपूजन सोहळ्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या असून, आता प्रत्यक्ष कामाला वेग देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

क्लस्टरला जागतिक दर्जाचा चेहरा द्या!

क्लस्टर योजनेत केवळ पुनर्विकास न करता जागतिक दर्जाच्या इमारती उभारण्याची गरज असल्याचे शिंदे यांनी सांगितले. लंडनमधील आयकॉनिक इमारतींच्या धर्तीवर आकर्षक आणि आधुनिक इमारती उभाराव्यात. अशा दर्जेदार इमारती उभारणाऱ्या विकासकांना नगरविकास विभागाच्या माध्यमातून प्रोत्साहक एफएसआय (इन्सेंटिव्ह एफएसआय) देण्याची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

रोजगाराचे हब उभारणार

क्लस्टरमध्ये केवळ घरांची निर्मिती न करता व्यावसायिक क्षेत्रालाही चालना देण्यात येणार आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. ‘रोजगार हब’ निर्माण करण्यावरही भर दिला जाणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

योजनेतील नागरिकांना टीव्ही भेट द्या

या योजनेतील नागरिकांना विकासकांनी टीव्ही उपलब्ध करून देण्याचा आग्रह आपण विकासकांकडे करत असल्याचे शिंदे यांनी शेवटी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT