डोंबिवली – पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांना अप्रत्यक्षरीत्या टोला लागावत ज्या माणसांना स्वातंत्र्यवीर सावरकर कळत नाही त्यांना बोलण्याचा काहीच अधिकार नाही असे वक्तव्य डोंबिवलीत निघालेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेच्या दरम्यान सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले. खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावत मागील अडीच वर्षात काय काम केलं हे घेत असलेल्या सभेत उघड करावे असा सल्ला दिला.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मी माफी मागायला सावरकर नाही असे वक्तव्य केले होते. त्यानंतर संपूर्ण देशाचे राजकारण ढवळून निघाले. त्यानंतर महाराष्ट्रात स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा काढा असे आदेश शिंदे फडणवीस सरकारकडून देण्यात आले. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजप यांनी एकत्रितरित्या ही यात्रा काढण्याचे ठरवले. त्यानुसार डोंबिवली विधान सभा मतदार संघात आमदार रवींद्र चव्हाण आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही गौरव यात्रा पार पडली.
या यात्रेत स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमी रस्त्यावर उतरलेले पाहिला मिळाले तसेच या ढोल ताशे पथक देखील यात्रेत सहभाग होता. यावेळी सावरकरांच्या फोटोचे पूजन करून त्यांचे रथचीत्र काढण्यात आले. ही यात्रा फडके रस्त्यावर येऊन संपन्न झाली. त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या गाण्यांचा कार्यक्रम येथे पार पडला. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देताना मंत्री आणि आमदार रवींद्र चव्हाण यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा वक्तव्याचा धिक्कार केला. तर खासदार श्रीकांत शिंदे यांनी महाराष्ट्राचे राजकारण गेल्या नऊ महिन्या पासून खालच्या पातळीला जात असून विरोधी पक्षाकडून सकाळी उठल्यापासून शिव्या शाप देण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले. सत्ता गेल्यामुळे विरोधकांचा थयथयाट झाला असल्याचा आरोप त्यांनी केला.