डोंबिवली : समाजवादी पक्षाचे नेते तथा आमदार आबू आझमी यांनी औरंगजेबाची स्तूती केल्याने राज्यभरात त्याचे पडसाद उमटले आहेत. आबू आझमी यांच्या विरोधात देशद्रोहाचा खटला दाखल करण्याची मागणी देखील करण्यात येत आहे. ही मागणी एकीकडे शिवसेनेच्या शिंदे गटाने केली आहे. तर दुसरीकडे आझमी यांच्या भूमीकेबद्दल ठाकरे गटानेही टीका केली आहे. या दोन्ही गटांवर मनसेने हल्लाबोल केला आहे.
मनसेचे नेते तथा माजी आमदार राजू पाटील यांनी आबू आझमी यांचे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या सोबतचे फोटो ट्वीट तर केलेच, शिवाय "आम्हीच खातो माती...मग त्यांना कशी राहिल भिती..." अशा शब्दांत राजू पाटील यांनी शिवसेनाच्या ठाकरे व शिंदे अशा दोन्ही गटांवर सडकून टीका केली आहे.
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या छावा चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम दाखवण्यात आला आहे. संभाजी महाराजांनी औरंगजेबाला भीक घातली नाही. एकीकडे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजत असताना राज्याचे अधिवेशन सुरू आहे. तर दुसरीकडे याच दरम्यान औरंगजेबाची स्तूती करणारे समाजवादी पक्षाचे आमदार आबू आझमी वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. आझमी यांच्या बेताल वक्तव्यामुळे राज्यभरात त्यांच्या विरोधात टिकेची झोड घेण्यात आली आहे. त्याचबरोबर ठिकठिकाणी राजकीय पक्षांकडून आझमींच्या विरोधात आंदोलने केली जात आहेत.