प्रशासनाकडे विरोध नोंदवूनही क्लस्टरसाठी जबरदस्ती केली जात असल्याने डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी मानपाड्याला भेट दिली. Pudhari News Network
ठाणे

ठाण्याच्या क्लस्टरच्या विरोधात आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी फुंकले रणशिंग

मानपाड्यातील घरांवरील मोजणी क्रमांकांवर फासला पांढरा रंग

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : मानपाडा, आझादनगर, मनोरमा नगर येथील प्रस्तावित क्लस्टर डेव्हलपमेंटला स्थानिकांकडून प्रचंड विरोध होऊ लागला आहे. येथील नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार डॉ.जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली रणशिंग फुंकले आहे.

आमदार डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी घरांवर टाकलेले नोंदणी क्रमांक पांढर्‍या रंगाने पुसण्यास सुरूवात केली आहे. दरम्यान, जनमताचा आदर करणे लोकशाहीत अभिप्रेत असतानाही लोकांचा विरोध असतानाही कशासाठी क्लस्टरचा हट्ट धरत आहात, असा सवाल डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.

मानपाडा, मनोरमा नगर, आझादनगर आदी परिसरात ठाणे महानगर पालिकेकडून क्लस्टर डेव्हलपमेंट (समूह विकास) योजना राबविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. स्थानिक नागरिकांचा विरोध असतानाही ही योजना राबविण्यात येत असून जानेवारी महिन्यात येथील शाळांवर हातोडा चालविण्यात आला होता. प्रशासनाकडे विरोध नोंदवूनही क्लस्टरसाठी जबरदस्ती केली जात असल्याने डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी आज मानपाड्याला भेट दिली. या प्रसंगी हजारो रहिवाशी उपस्थित होते. आमची घरे वाचविण्यासाठी आम्हाला साह्य करा, अशी विनंती स्थानिकांनी डॉ.आव्हाड यांना केली. त्यावर आव्हाड यांनी गोरगरिबांच्या लढ्यात आपण नेहमीच पुढे असतो, असे सांगितले.

ठाणे महानगर पालिकेचे काम जनतेला नागरी सुविधा पुरवण्याचे आहे. पण, इथे बिल्डर्सची धनसंपत्ती वाढविण्यातच ठामपा अधिकार्‍यांना अधिक स्वारस्य आहे. जानेवारी महिन्यात जर शाळा तोडल्या जात असतील तर पैशापुढे माणुसकी हरत असल्याचेच दिसत आहे. तुम्ही मत देताना विचार केला नाही. ज्यांना मत देऊन विजयी केले तेच आता तुमच्या डोक्यावरचे छतच हटवत नाहीत तर तुमच्या नरडीवर पाय देत आहेत. आपल्याकडे रस्ता नाही, पाणी नाही. यावर आपण प्रश्न विचारत नाही. पण, अधिकार्‍यांसमोर आपण शरणागती पत्करतोय. आता शरणागती पत्करायची नाही. उन्हा-पावसात मी तुमच्यासाठी लढायला सज्ज आहे. पण, तुम्ही देखील लढायला हवे ना! जर प्रत्येक घरातून फक्त एक माणूस रस्त्यावर उतरला ना तर कुणाच्या बापाची हिमंत नाही आपल्याला घराबाहेर काढायची, गोरगरिबांच्या रागाची परीक्षा घेऊ नका. आता ही जबरदस्ती सहन केली जाणार नाही. घरावर आलात तर शिंगावर घेऊन भिरकावून देऊ, असेही ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT