क्राइम file photo
ठाणे

ठाण्यात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठासाठी राखीव भूखंडाचा गैरवापर

यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून मनसेचे ठिय्या आंदोलन

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठासाठी ठाणे महानगरपालिकेने आरक्षित केलेला भूखंड शिक्षणाच्या उद्देशाने वापरण्याऐवजी अन्य व्यावसायिक उपक्रमांसाठी वापरला जात असल्याची गंभीर बाब महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे स्वप्नील महिंद्रकर यांनी उघड केली होती. या भूखंडावर कपडे आणि घरगुती वस्तूंच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याने, हा थेट भूखंडाच्या उद्देशाविरुद्धचा गैरवापर असल्याचे दिसून येत असताना देखील ठाणे महानगरपालिका झोपायचं सोंग करत होती.

ठाणे महानगरपालिकेच्या प्रशासनाने पोखरण क्रमांक २, हिरानंदानीजवळील निहारिका संकुलाजवळ असलेला भूखंड यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाला कवडीमोल भावात भाडेतत्त्वावर दिला होता. ठाणे शहरात विद्यापीठाचे केंद्र नसल्याने, स्थानिक विद्यार्थ्यांना मुंबई किंवा अन्य ठिकाणी जाण्याची गरज भासू नये, हा मुख्य उद्देश होता. या भूखंडावर विद्यापीठाची स्थापना करून ठाण्यातील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याचा महानगरपालिकेचा हेतू होता. गेल्या दहा वर्षांपासून हा भूखंड रिकामा होता, मात्र आता विद्यापीठ स्थापनेसाठी देण्यात आलेल्या जागेचा वापर व्यवसायिक कारणांसाठी केला जात आहे.

या भूखंडावर विद्यापीठाऐवजी कपडे आणि घरगुती वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात आल्याकारणाने मनसेच्या वतीने हा भूखंड खाली करण्यासाठी व भूखंड धारकाला भूखंडाचा व्यावसायिक वापर केल्याच्या अनुषंगाने त्याच्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी महापालिका आयुक्त यांना निवेदन देण्यात आले. परंतु, निवेदनाची दखल न घेतल्या कारणाने मनसेचे ठाणे उपशहर अध्यक्ष पुष्कर विचारे यांच्यावतीने यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ साठी आरक्षित असलेल्या भूखंडाच्या बाहेर ठिय्या आंदोलन करून प्रशासनाचा निषेध नोंदविण्यात आला. तसेच भूखंड त्वरित अतिक्रमण मुक्त करण्यात आला नाही तर सदर विषयासंदर्भात शिक्षणमंत्र्यांकडे दाद मागण्यात येईल असे मनसेच्या वतीने नमूद करण्यात आले. आंदोलनप्रसंगी किरण पाटील, नीलेश चौधरी, महेश चव्हाण, रवींद्र महाले, सागर भोसले, योगेश मोहिते मनसे पदाधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT