Mira Road Traffic Police Assault File Photo
ठाणे

Mira Road Traffic Police Assault: महिला वाहतूक पोलिसाला मारहाण; सरकारी कामात अडथळा प्रकरणी तरुणीवर गुन्हा दाखल

याप्रकरणी मिरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढारी वृत्तसेवा

मिरा रोड : नो-पार्किंगमधून टोईंग करून आणलेली दुचाकी दंड न भरता जबरदस्तीने घेऊन जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका २५ वर्षीय तरुणीने, तिला अडवणाऱ्या महिला वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना मिरारोड येथे घडली आहे. या वादात आरोपी तरुणीने महिला पोलीस हवालदाराचे केस ओढून शासकीय कामात गंभीर अडथळा निर्माण केला. याप्रकरणी मिरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिरा-भाईंदर शहरात वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या आणि नो-पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांवर वाहतूक पोलिसांकडून सातत्याने कारवाई केली जाते. रविवारी सायंकाळी काशीमिरा वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी नो-पार्किंगमध्ये उभी असलेली स्कूटी टोईंग करून मिरारोड येथील लल्लन तिवारी कॉलेज जवळील अधिकृत गोडाऊनमध्ये आणली होती.

नियमानुसार, टोईंग केलेले वाहन दंड भरल्याशिवाय सोडले जात नाही. मात्र, रविवारी सायंकाळी तरुणी दिया ठाकूर (वय २५ वर्षे) ही गोडाऊनमध्ये आली. तिने तेथील कर्मचाऱ्यांना कोणतीही विचारपूस न करता थेट आपली स्कूटी शोधली आणि दंड न भरताच ती घेऊन जाण्याचा प्रयत्न करू लागली.

गोडाऊनमधील कर्मचाऱ्यांनी तरुणीला अडवले आणि कर्तव्यावर असलेल्या महिला वाहतूक पोलीस हवालदार पूनम ठाकरे यांना याची माहिती दिली. पोलीस कर्मचारी ठाकरे यांनी तरुणीला शांत करण्याचा प्रयत्न केला आणि नियमानुसार आधी दंड भरा, त्यानंतरच गाडी नेता येईल, असे कायदेशीर प्रक्रिया समजावून सांगितली.

मात्र, कायदेशीर प्रक्रिया समजून घेण्याऐवजी आरोपी दिया ठाकूर हिने पोलीस कर्मचारी ठाकरे यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. हा वाद इतका वाढला की, आरोपी तरुणीने थेट ठाकरे यांच्यावर हल्ला केला. तिने ठाकरे यांना हाताने मारहाण करत त्यांचे केस (झिंज्या) ओढले आणि तिथे मोठा गोंधळ घातला.

या घटनेनंतर महिला वाहतूक पोलीस कर्मचारी पूनम ठाकरे यांनी मिरारोड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. त्यांच्या तक्रारीवरून आरोपी दिया ठाकूर (२५) हिच्याविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिरारोड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मेघना बुरांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण भोसले या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

टोईंग केलेल्या वाहनाचा दंड भरण्यावरून रविवारी सायंकाळी मिरारोड येथील गोडाऊनमध्ये वाद झाला. आरोपी महिलेने कर्तव्य बजावणाऱ्या महिला पोलीस कर्मचारी पूनम ठाकरे यांच्यावर हल्ला करत मारहाण केली. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-प्रफुल वाघ, वरिष्ठ पोलीस, निरीक्षक, वाहतूक शाखा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT