Thane Bribery Case pudhari photo
ठाणे

Thane Bribery Case : ३ हजाराची लाच मागणाऱ्या शिधावाटप निरीक्षकाला १ वर्षाचा सक्त कारावास

ठाणे न्यायालयाचा निकाल

पुढारी वृत्तसेवा

मिरा रोड : रेशनिंग दुकानातील कथित अपहारावर कारवाई न करण्यासाठी तक्रारदार महिलेकडे ३ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या शिधावाटप निरीक्षकाला ठाणे अतिरिक्त सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे. न्यायालयाने आरोपीला एक वर्षाचा सक्त कारावास आणि ५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. विजयकुमार कचेश्वर वाघ असे शिक्षा झालेल्या तत्कालीन निरीक्षकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विजयकुमार वाघ हे भाईंदर येथील ४१/फ शिधावाटप कार्यालयात कार्यरत होते. त्यांनी तक्रारदार स्नेहल पवार यांच्या रेशनिंग दुकानाची तपासणी केली होती. या तपासणीत दुकानात अपहार झाल्याचे समोर आणून कारवाई करण्याची भीती त्यांनी दाखवली.

कारवाई टाळण्यासाठी वाघ यांनी तक्रारदाराकडे ३ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आल्यानंतर, जानेवारी २०१६ मध्ये नयानगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या खटल्याची सुनावणी ठाणे येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एन. एस. लोणे यांच्या न्यायालयात पार पडली. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद आणि सादर केलेले पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी विजयकुमार वाघ यांना दोषी ठरवत १ वर्षाचा सक्त कारावास आणि ५ हजार रुपये दंड, अशी शिक्षा ठोठावली. सदर प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

एसीबी ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील आणि अपर पोलीस अधीक्षक सुहास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे कामकाज चालले. सरकार पक्षातर्फे ॲड. पावसे यांनी प्रभावी युक्तिवाद केला. या खटल्यात ट्रायल अधिकारी पोलीस उपअधीक्षक रुपाली पोळ, कोर्ट अंमलदार अनिता पाटील आणि पोलीस हवालदार सतीश ठाकरे यांनी सहकार्य केले.

दरम्यान, कोणत्याही शासकीय कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन ठाणे करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT