मिरा रोड : महाराष्ट्र राज्यात गुटखा विक्रीवर बंदी असतानाही मिरा-भाईंदर शहरात बिनधास्तपणे प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री सुरू असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. मिरा रोड येथील सृष्टी परिसरात सुरू असलेल्या एका अनधिकृत नाश्त्याच्या दुकानात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा तसेच अमली पदार्थांचा साठा असल्याचा प्रकार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष संदीप राणे यांनी उघडकीस आणला आहे. याप्रकरणी काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मिरा रोड भागातील सृष्टी परिसरात नाश्त्याच्या दुकानाच्या नावाखाली सुरू असलेल्या या व्यवसायात प्रतिबंधित गुटख्याची साठवणूक व विक्री केली जात असल्याची बाब राणे यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तत्काळ या प्रकाराकडे संबंधित प्रशासनाचे लक्ष वेधले. या दुकानाची सखोल तपासणी करून हा गुटख्याचा साठा कोठून आणला जात होता, यामागे कोणाचे जाळे कार्यरत आहे आणि या अनधिकृत व्यवसायाला कोणाचे अभय आहे, याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी संदीप राणे यांनी केली आहे.
महाराष्ट्र शासनाने गुटख्यावर बंदी घातलेली असतानाही मिरा-भाईंदर शहरातील गल्लोगल्ली पानटपऱ्यांवर सर्रास गुटखा विक्री सुरू आहे. शहरातील अनेक भागांत गुटख्याची मोठी गोदामे असल्याचे बोलले जात असून, गुजरात आणि कर्नाटक या परराज्यांतून रेल्वे व रस्ते मार्गाने हा गुटखा शहरात आणला जात असल्याची माहिती समोर येत आहे. असे असतानाही अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आणि स्थानिक पोलिसांकडून ठोस कारवाई होताना दिसत नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
सार्वजनिक आरोग्याशी सुरू असलेला हा खेळ थांबवण्यासाठी एफडीए, पोलीस आणि महापालिका प्रशासनाने संयुक्तपणे धडक कारवाई करावी, अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे. मिरा भाईंदर शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असताना या शहरात अमली पदार्थांच्या विक्रीत देखील वाढ होताना दिसत आहे.
तरुण पिढी या अमली पदार्थांच्या आहारी जाऊन आपले आयुष्य उद्ध्वस्त करत आहेत. ही कारवाई कठोरपणे होत नसल्याने त्यांना जामीन मिळाला की पुन्हा अमली पदार्थाची विक्री सुरू केली जाते. त्यामुळे परिसरात कारवाईची मागणी होत आहे.