Mira Road Woman Burn Pudhari
ठाणे

Mira Road Woman Burn: जेवण गरम करताना कपड्यांनी पेट घेतल्याने वृद्धेचा मृत्यू

80 टक्के भाजल्याने उपचारादरम्यान केईएममध्ये अखेरचा श्वास

पुढारी वृत्तसेवा

मिरा रोड : घरत एकट्या असताना जेवण गरम करत असताना साडीने पेट घेतल्याने 75 वर्षीय वृद्ध महिला गंभीररीत्या भाजली होती. दुर्दैवाने, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. ही घटना शांतीनगर परिसरात 1 मार्च रोजी घडली असून, उपचारासाठी तीन रुग्णालये बदलल्यानंतर अखेर केईएम रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रमा रमेश निरूळकर (75) असे मृत वृद्धेचे नाव आहे. त्या मिरा रोड , शांतीनगर सेक्टर 2 मध्ये आपल्या कुटुंबासह वास्तव्यास होत्या.

मिळालेल्या माहितीनुसार, 1 मार्च रोजी रमा निरूळकर या घरात एकट्या होत्या. दुपारी जेवण गरम करत असताना अचानक त्यांच्या कपड्यांना आग लागली. गंभीररीत्या भाजलेल्या अवस्थेत त्यांनी तातडीने आपली नातेवाईक चित्रा मोरे यांना फोन करून मदतीसाठी बोलावले. चित्रा तातडीने घरी पोहोचल्या, मात्र दरवाजा आतून बंद होता. चावीने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता तो उघडत नव्हता. अखेर चावीवाल्याला बोलावण्यात आले. त्याच वेळी त्यांचा नातू ओंकार देखील तेथे पोहोचला.

दरवाजा उघडला असता रमा निरूळकर जमिनीवर पडलेल्या होत्या आणि त्यांच्या अंगावरील कपडे जळलेले होते. त्यांना तातडीने भाईंदरच्या टेंभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथे पुरेशा सुविधा नसल्याने त्यांना कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात हलवण्यात आले. तेथेही सुविधांचा अभाव आणि वृद्ध महिला 80 टक्के भाजलेली असल्याने त्यांना मुंबईच्या केईएम रुग्णालयात नेण्यात आले.

1 मार्च रोजी रात्री त्यांना केईएममध्ये दाखल करून उपचार सुरू करण्यात आले, मात्र प्रकृती अधिक खालावल्याने 2 मार्च रोजी डॉक्टरांनी त्यांना दाखलपूर्व मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच नयानगर पोलिसांनी नोंद घेतली आहे. पोलीस हवालदार अन्वर शेख या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. मृताचे नातेवाईक सुबोध रमेश निरूळकर यांनी 28 मार्च रोजी याप्रकरणी पोलिसांत खबर दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT