Why did MNS attack shopkeeper in Mira Bhayandar?
मिरा भाईंदरः एका दुकानदाराला मनसेच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मिरा भाईंदरमधील व्यापाऱ्यांनी मनसे विरोधात बंद पुकारला. मनसेच्या कार्यकर्त्यांकडून दुकानदारांना नाहक त्रास दिला जातो, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. हा वाद नेमका काय आहे, मनसेची याबाबतची भूमिका काय आहे, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे का, सरकारने याबाबत काय म्हटले हे जाणून घेऊया पुढारी विश्लेषणातून...
मनसेने मिरारोडच्या दुकानदाराला मारहाण का केली?
मिरा रोड पूर्व येथे जोधपूर स्वीट्स आणि नमकीन हे दुकान असून या दुकानाच्या मालकाला मराठी बोलता येत नाही यावरून मनसेकडून मारहाण करण्यात आली होती. हिंदी सक्तीचा जीआर रद्द झाल्यानंतर मनसेचा विजयोत्सव सुरु होता. मिठाई आणि पाण्याची बॉटल विकत घेण्यासाठी मिरा रोड पूर्वेतील या दुकानात मनसैनिक गेले होते. दुकानदार हिंदीत बोलत असल्याने मनसैनिकांनी त्याला मराठीत बोल, असं बजावलं. मनसैनिकांनी दुकानदाराला विचारले की, महाराष्ट्राची भाषा कोणती आहे. यावर दुकानदार म्हणाला की, आमच्या इथे हिंदीच चालते. यावरून वाद चिघळला आणि मनसैनिकांनी त्या दुकानदाराला मारहाण केली.
पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे का?
मारहाणीप्रकरणी सात जणांविरुद्ध काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाबूलाल खिमजी चौधरी (वय 48) या दुकानदाराने या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. मंगळवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास काही मनसैनिक दुकानात आले होते. यावेळी दुकानातील कामगारांनी हिंदीत संवाद साधला. यावरून मनसैनिक संतापले आणि त्यांनी मारहाण केली, असे तक्रारीत म्हटले आहे. सात पैकी तीन जणांना पोलिसांनी नोटीसदेखील बजावली आहे.
मिरा रोडच्या दुकानदारांचे म्हणणे काय?
मंगळवारच्या घटनेचे पडसाद मिरा भाईंदरमधील व्यापाऱ्यांमध्येही उमटले आहेत. गुरुवारी मिरा भाईंदरच्या व्यापारी संघटनांनी मनसेच्या गुंडगिरीविरुद्धात बंदची हाक दिली. गुंडप्रवृत्ती आणि अन्यायाविरुद्ध सर्व दुकानदारांनी एकत्र यावे आणि बंदात सहभागी व्हावे, असे आवाहन व्यापारी एकता मंचाने केले होते. यानंतर गुरुवारी मिरा भाईंदरमधील सर्व दुकानदारांनी बंदला पाठिंबा दर्शवला.
सरकारने याबाबत काय म्हटले आहे?
महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले की, महाराष्ट्रात कायद्याचे पालन झालेच पाहिजे. कोणीही कायदा हातात घेऊ नय. मात्र, महाराष्ट्रात मराठीत बोललंच पाहिजे. मराठीत बोलणार नाही अशी आडमुठी भूमिका चालणार नाही.
गेल्या काही महिन्यांपासून हिंदी- मराठी हा वाद उफाळून आला आहे. काही लोक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा वाद चिघळवत आहे. मराठीला मानसन्मान दिलाच पाहिजे. मराठीचा अवमान होत असल्याचे निदर्शनास आल्यास याची तक्रार पोलिसांकडे करावी, असं आवाहन त्यांनी केले.
तुम्ही महाराष्ट्रात राहता, तुमच्या दुकानाची किंमत कोटींची आहे. तुम्हाला महाराष्ट्राची भाषा माहिती नाही? ज्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय, तुम्ही एवढे वर्ष राहिलात महाराष्ट्रात पोट भरलं, इथल्या आगरी कोळी समाजाच्या जागा विकत घेतल्यात आणि त्यांच्या जीवावर तुम्ही हे सगळं उभं केलं त्या आगरी कोळी समाजाची भाषा तुम्हाला माहित नाही? तुमच्यासोबत गर्दी जमवून एखाद्या गोष्टीचा निषेध करणे योग्य आहे का? जर हे ठीक असेल तर आपण आगरी कोळी मराठी लोकांसह एक मोठे आंदोलन सुरू करावं का?अविनाश जाधव, मनसे नेते
मनसेने मिरा भाईंदरमधील घटनेवर काय म्हटले आहे?
मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाची बाजू मांडली. जाधव म्हणाले, व्यापारी व मनसेमधील हा वाद आम्हाला संपवायचा होता. पण येथील एका भाजप नेत्याने लोकांना निषेध करण्यास सांगितले.
जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तो केवळ फक्त ४० सेकंदांचा आहे. तोच मीडियामध्ये दाखवण्यात आला आणि उर्वरित व्हिडिओ दाखवण्यात आला नाही. 40 सेकंदाचा व्हिडिओ कट करून सगळीकडे पसरवण्यात आला तो व्हिडिओ कोणी पसरवला याचा शोध घेतला पाहिजे, अशी मागणीही जाधव यांनी केली आहे.