भाईंदर (ठाणे) : मीरारोडच्या छत्रपती शिवाजी महाराज या मुख्य मार्गावर असलेल्या प्लेझन्ट पार्क जवळील रस्त्यावर पडलेल्या भल्या मोठ्या खड्ड्यात लाडक्या बहिणीच्या रिक्षाचं चाक आदळलं आणि ते मोडल्याची घटना शुक्रवारी (दि.25) घडली. घटनेची माहिती मिळताच मनसैनिकांनी घटनास्थळी धाव घेत पालिकेच्या खड्डेभरी दास्तानला धारेवर धरीत स्थानिक लोकप्रतिनिधींना धारेवर धरीत त्यांचे वाभाडे काढले.
मिरा-भाईंदरमध्ये ठिकठिकाणच्या डांबरी रस्त्यांवर मोठ्याप्रमाणात खड्डे पडले आहेत. भाईंदर येथील लाकडी बहीण कांचन विश्वकर्मा नामक महिला रिक्षा चालक 25 जुलै रोजी भाईंदर पश्चिमेहून काशिमीरा येथे प्रवाशांना सोडल्यानंतर त्या पुन्हा भाईंदरकडे परतत होत्या. त्या प्लेझंट पार्क जवळ आल्या असता तेथील रस्त्यावर पडलेल्या भल्यामोठ्या खड्ड्यात पाणी साठल्याने खड्ड्याचा अंदाज न आल्याने कांचन यांच्या रिक्षाच चाक त्या खड्ड्यात जोरात आदळलं आणि ते मोडलं. यात कांचन यांच्या पायाला किरकोळ मार लागला.
घटनेची माहिती मिळताच मनसेने त्याठिकाणी धाव घेत आंदोलन छेडले. मनसैनिकांनी त्या महिला चालकाच्या रिक्षाचे झालेले नुकसान पालिकेने भरून द्यावे, अशी मागणी करीत भाऊबंदकी निभावली. तर मनसेच्या आंदोलनाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रिक्षा टोईंग करून दुरुस्तीसाठी रवाना केली. शहरातील ठिकठिकाणच्या डांबरी रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असताना त्याची दुरुस्ती होताना दिसत नाही.
शहरात काँक्रीटचे रस्ते होत असले तरी त्याचा दर्जा सुमार होत असल्याने त्याला देखील काही महिन्यांतच भेगा पडू लागल्याचे दिसून येत आहे. तसेच काही सिमेंट रस्त्यांवरील सिमेंटच वाहून गेल्याने ते खडीयुक्त सिमेंटचे रस्ते असल्याचा भास होत आहे. या खड्डेयुक्त रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत मनसेने त्याला राज्य शासनासह, स्थानिक लोकप्रतिनिधी व पालिका प्रशासन जबाबदार असल्याचे सांगितले. या सर्वांनी शहरातील लोकांना केळं आणि गाजर दाखविण्यास सुरुवात केल्याचा आरोप त्यांनी केला.
घटनास्थळी असलेला खड्ड्यात तात्काळ भराव टाकून त्याची तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली. आंदोलनात मनसेचे सचिन पोपळे, रॉबर्ट डिसोझा, अभिनंदन चव्हाण आदींचा समावेश होता. यावर पालिकेने मात्र शहरांतर्गत रस्त्यांवर पडलेले खड्डे पालिकेकडून दुरुस्त केले जात असून मेट्रोचे काम सुरु असलेल्या ठिकाणच्या रस्त्यावरील खड्ड्यांची दुरुस्ती मेट्रो ठेकेदाराकडून तर महामार्गावरील खड्ड्यांची दुरुस्ती भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून करण्याबाबतचे पत्र पालिकेकडून देण्यात आल्याचे सांगितले.