Mira Bhayandar Demolition Pudhari
ठाणे

Mira Bhayandar Demolition: आरक्षणावरील 2 अनधिकृत धार्मिकस्थळे अखेर जमीनदोस्त; गोपनीयता बाळगून पालिका व पोलिसांनी केली कारवाई

कारवाईमुळे आरक्षण अतिक्रमण मुक्त झाले असून हि कारवाई करताना शहरात धार्मिक तेढ निर्माण होऊ नये, यासाठी पालिका व पोलिसांनी अत्यंत गोपनीयता बाळगली होती.

पुढारी वृत्तसेवा

भाईंदर: म‍िरा-भाईंदर महापाल‍िकेच्या आरक्षण क्रमांक १२२ वरील दोन अनधिकृत धार्मिकस्थळांवर अखेर प्रशासनाने सोमवारी तोडक कारवाई करून हि बांधकामे मोठ्या प्रतिक्षेनंतर जमीनदोस्त केली.

कारवाईमुळे आरक्षण अतिक्रमण मुक्त झाले असून हि कारवाई करताना शहरात धार्मिक तेढ निर्माण होऊ नये, यासाठी पालिका व पोलिसांनी अत्यंत गोपनीयता बाळगली होती. हि तोडक कारवाई नियमानुसार करण्यात आल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.

भाईंदर पूर्वेकडील आझादनगर याठिकाणी पालिकेचे सामाजिक वनीकरण व खेळाच्या मैदानाचे आरक्षण क्रमांक १२२ टाकण्यात आले आहे. मात्र त्यावर अनधिकृत झोपड्या, औद्योगिक गाळे, धार्मिकस्थळांचे अनधिकृत बांधकामे करण्यात आली होती. यातील झोपड्या व औद्योगिक गाळ्यांवर पालिकेने काही महिन्यांपूर्वी तोडक कारवाई केली.

तर या ठिकाणी बेकायदेशीरपणे मस्जिद व मंदिराचे बांधकाम करण्यात आले होते. पालिकेने या अनधिकृत धार्मिकस्थळांवर यापूर्वी अनेकदा कारवाईचा प्रयत्न केला होता. त्याला त्या-त्या धर्मातील लोकांनी तीव्र विरोध केला होता.

या कारवाईमुळे शहरात धार्मिक तेढ निर्माण होऊ नये, यासाठी पालिकेने आत्तापर्यंत कारवाई बासनात गुंडाळली होती. यंदा पालिकेने आयुक्त राधाबिनोद शर्मा यांच्या निर्देशानुसार कारवाईपूर्वी सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता केली. यानंतर त्या धार्मिक स्थळांवरील कारवाईची रूपरेषा पालिकेकडून आखण्यास सुरुवात झाली. दरम्यान आयुक्तांच्या पुढाकाराने दोन्ही धर्मियांची बैठक आयोजित करून ती धार्मिक स्थळे हटविण्याबाबत चर्चा करण्यात आली.

सूर्योदय होताच कारवाईला सुरूवात

हि कारवाई सूर्योदय होताच सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले होते. तत्पूर्वी पहाटे दोन्ही धार्मिक स्थळांमधील देवी-देवतांच्या मुर्त्या, पवित्र ग्रंथ आदी धार्मिक वस्तू काढण्यात आल्या. सूर्योदय होताच दोन्ही धार्मिक स्थळांवर बुलडोझर फिरविण्यात आला.

यावेळी मंदिरातील पुजारी व मस्जिदमधील मौलाना यांना विश्वासात घेण्यात आले होते. तर कारवाईत दोन्ही धार्मिक समाजाकडून विरोध होऊ नये अथवा अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी कारवाईच्या ठिकाणापासून काही अंतरावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. या पूर्वनियोजनामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रतिक्षेत असेलेली कारवाई पूर्ण होऊन पालिकेचे आरक्षण सोमवारी मोकळे करण्यात आले.

हि कारवाई कायदा व सुव्यवस्था अबाधित राखून आवश्यक पोलीस बंदोबस्तात करण्यात आली. पालिका प्रशासन व पोलीस यंत्रणेच्या समन्वयातून तर दोन्ही धर्मियांच्या सहकार्यातून हि कारवाई सुरळीतपणे पार पाडण्यात आली. कारवाई अत्यंत संवेदनशीलतेने, शिस्तबद्ध नियोजनाद्वारे व कायद्याच्या चौकटीत राहून करण्यात आली असून कारवाईदरम्यान कोणत्याही प्रकारे सामाजिक अथवा धार्मिक सलोखा बाधित होणार नाही तसेच कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत याची विशेष काळजी घेण्यात आली होती. यामुळे संपूर्ण कारवाई शांततेत व कोणताही अनुचित प्रकार न घडता यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली.
- राधाबिनोद शर्मा, आयुक्त.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT