भाईंदर : राजू काळे
मिरा-भाईंदर महापालिकेच्या विविध आरक्षणांवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शासकीय निधीच्या माध्यमातून विकासकामे प्रस्तावित व नियोजित केली आहेत. हि सर्व विकासकामे नियमबाह्य असल्याचा आरोप करीत त्या कामांच्या मंजूर नकाशांच्या चौकशीसाठी महापौर डिंपल मेहता यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा भाजपचा ठराव मंजूर करण्यात आला.
हा ठराव भाजपचे नगरसेवक दिनेश जैन यांनी मांडला होता. जैन यांनी शहरातील विविध आरक्षणांवर होत परिवहन मंत्र्यांच्या माध्यमातून झालेल्या विकासकामांचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. त्यात त्यांनी सुरुवातीला भाईंदर पूर्वेकडील आरक्षण क्रमांक 122 वर साकारण्यात आलेल्या हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे दालनाचा मुद्दा उपस्थित करून या कलादालनासाठी 2016 मधील महासभेत झालेल्या मंजूर ठरावानुसार एकूण 24 कोटी 87 लाख रुपये खर्च करण्यास मान्यता देण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात त्यासाठी तब्बल 139 कोटी 54 लाख 34 हजार 65 रुपयांचा शासकीय निधी खर्च करण्यात आल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. हा खर्च कसा काय वाढला त्यावर त्यांनी प्रश्न उपस्थित करून या कलादालनाचे अनेकदा उदघाटन झाले असले तरी अद्यापही त्याचे काम सुरु असून ते जनतेसाठी आजपर्यंत खुले करण्यात आले नसल्याचे म्हटले.
तर चेना नदीवर पूल बांधणे व रस्ता तयार करण्याची मागणी कोणीही केली नाही, मंजूर विकास योजनेत रस्ता प्रस्तावित नसतानाही त्याचा समावेश करण्यात येऊन त्यासाठी 26 कोटींचा खर्च अंदाजित करण्यात आल्याचे भाजप नगरसेवक ज्योत्स्ना हसनाळे यांनी निदर्शनास आणून दिले. तसेच काशिमीरा येथील पालिकेच्या उद्यानासाठी आरक्षित असलेल्या जागेवर ऑलिम्पिक साईज तरणतलाव व आवश्यक सुविधेची इमारत बांधण्यासाठी 10 कोटी खर्च अंदाजित करण्यात आला आहे. मात्र या जागेत सुधारीत प्रारूप विकास योजनेंतर्गत उद्यानाचे आरक्षण दर्शविण्यात आले असून त्या जागेवरील 15 टक्के जागेत तरणतलाव व सुविधा इमारतीचे बांधकाम कसे करणार, असा प्रश्न भाजप नगरसेवक भगवती शर्मा यांनी उपस्थित केला.
1. याचप्रमाणे भाईंदर पूर्वेकडील आरक्षण क्रमांक 219 वर जिमनॅस्टिक सेंटर बांधण्यासह धर्माधिकारी बैठक सभागृह, उत्तराखंड समाज, हिमाचल प्रदेश समाज, केरळ समाज, ओरिसा समाज भवनचे बांधकाम सुरु असून याच आरक्षण क्रमांकाच्या जागेत तरणतलाव व आवश्यक सुविधा इमारतीचे बांधकाम देखील सुरु असल्याचा मुद्दा शर्मा यांनी उपस्थित करून हे आरक्षण माध्यमिक शाळा व खेळाच्या मैदानासाठी राखीव असताना त्यावरील संबंधित कामांचे नकाशे कसे काय मंजूर केल्याचा प्रश्न संबंधित अधिकाऱ्यांना विचारला.
2. याखेरीज मीरारोड येथील उद्यानाच्या आरक्षित जागेत बेकायदेशीर ट्रॅफिक पार्क उभारण्यात आले असून त्याचा उद्देश सार्थ झाला नसून पालिकेने मंजूर केलेले नकाशे चुकीचे असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला. यांसह इतर आरक्षणांवर देखील नियमबाह्यपणे बांधकामे सुरु असल्याने त्याची चौकशी करण्यासाठी महापौर डिंपल मेहता यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याची मागणी दिनेश जैन यांनी केली. त्याचा ठराव त्यांनी मांडला असता तो बहुमताने मंजूर करण्यात आला.