मिरा रोड : पुढारी वृत्तसेवा
ज्या व्हिएतनामच्या भूमीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याचा अभ्यास करून महासत्तेला पराभूत केले, त्याच भूमीवर शिवजन्मभूमीतील नेतवड (ता. जुन्नर) गावच्या सुकन्या आणि मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या रेशमा कुटे यांनी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. व्हिएतनाम येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत फुल्ल आयर्नमॅन किताब जिंकत त्या मिरा-भाईंदर शहर आणि मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील पहिल्या आयर्नमॅन महिला ठरल्या आहेत.
व्हिएतनाम येथे ही प्रतिष्ठेची स्पर्धा पार पडली. यामध्ये ३.८ किलोमीटर जलतरण, १८० किलोमीटर सायकलिंग आणि ४२ किलोमीटर धावणे असे खडतर अंतर रेश्मा कुटे यांनी निर्धारित वेळेपूर्वीच पूर्ण केले. त्यांच्या या देदीप्यमान यशामुळे मीरा-भाईंदर शहर आणि पोलीस दलात आनंदाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. या स्पर्धेसाठी रेश्मा यांनी ज्या सायकलवर संपूर्ण सराव केला होता, ती सायकल एअरलाइन्सच्या अचानक बदललेल्या नियमांमुळे मुंबई विमानतळावरच थांबवावी लागली.
यश एका दिवसात मिळत नाही....
१६१ किलोमीटर (१०० मैल) ओपन फीमेल गटात पहिल्या पाच धावपटूंमध्ये स्थान मिळवल्याबद्दल २०२५ मध्ये त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. लहानपणापासूनच वाचन आणि खेळाची आवड असलेल्या रेशमा कुटे सांगतात की, मोठे एस एका दिवसात मिळत नाही योग्य वेळेची वाट पाहण्यापेक्षा स्वतःच संधी निर्माण करा कोणत्याही क्षेत्राबद्दल खरी आवड असेल तर सुरुवात कुठूनही करा. अनुभव मेहनत आणि सातत्य यांची जोड मिळाली की यशाचा मार्ग आपोआप तयार होतो. पोलीस खात्यातील कायद्याच्या वर्गखोल्यांपासून आंतरराष्ट्रीय क्रीडा मैदानापर्यंतचा त्यांचा हा प्रवास आजच्या तरुण पिढीसाठी स्वप्नांना पंख देणारा ठरत आहे.
हक्काची सराव केलेली सायकल सोबत नसतानाही त्यांनी हार मानली नाही. व्हिएतनाममध्ये उपलब्ध करून घेतलेल्या आणि तांत्रिकदृष्ट्या काहीशा दोषपूर्ण असलेल्या सायकलवर त्यांनी केवळ आपल्या अनुभवाच्या व जिद्दीच्या जोरावर १८० किलोमीटरचा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केला. त्यांच्या या प्रतिकूल परिस्थितीतील लढवय्या वृत्तीचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. रेश्मा कुटे यांचा हा प्रवास अत्यंत संघर्षमय आणि प्रेरणादायी आहे. २०११ मध्ये गुडघ्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे त्यांना तब्बल सात वर्षे क्रीडा क्षेत्रापासून दूर राहावे लागले होते. मात्र, २०१९ मध्ये शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांनी पुन्हा नव्या जोमाने सराव सुरू केला.
१० किलोमीटर वॉकपासून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास आज १६१ किलोमीटर (१०० मैल) अल्ट्रा मॅरेथॉन ते फुल्ल आयर्नमॅनपर्यंत येऊन पोहोचला आहे. २४ तास पोलीस दलाचे खडतर कर्तव्य सांभाळत रेश्मा यांनी आतापर्यंत देश-विदेशातील ७५ हून अधिक मॅरेथॉन आणि विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेत अनेकदा पोडियम फिनिश (विजेतेपद) केले आहे. गतवर्षी दक्षिण आफ्रिकेतील जगप्रसिद्ध कॉग्रेड मॅरेथॉनमध्ये त्यांनी कांस्यपदक पटकावले होते. ओपन फीमेल गटात पहिल्या पाच धावपटूंमध्ये स्थान मिळवल्या बहुल २०२५ मध्ये त्यांना सन्मानित केले आहे.